मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या समवेत गेलेल्या आमदारांविषयी निर्णय घेण्याविषयी विधानसभा अध्यक्षांना सूचित करून २ मास झाले, तरी अद्याप विधानसेभेच्या अध्यक्षांनी यावर निर्णय दिलेला नाही. याविषयी उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभु यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. सर्वाेच्च न्यायालयात ११ मे या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाने ज्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका केली होती, त्यावर विधानसभेच्या अध्यक्षांनी वाजवी वेळेत निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. सुनील प्रभु यांनी याचिकेमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३ वेळा पत्र पाठवून याविषयी निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. १७ जुलै या दिवशी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष हा निर्णय येतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.