मुंबई – गुरुपौर्णिमेनिमित्त ‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ ३ जुलैपासून राज्यात चालू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रातिनिधिक स्वरूपात मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे महिला व बालविकास मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त राहुल मोरे, भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या सदस्य अधिवक्त्या लीना चव्हाण, मिशन साहसी संघटनेचे रोहित ठाकूर, तसेच मुंबई आणि एस्.एन्.डी. टी. विद्यापीठ यांच्या २०० विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
महिलांवर होणारे अत्याचार आणि आक्रमणेे याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. शाळकरी आणि महाविद्यालयीन युवतींना स्व-संरक्षणाचे धडे देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची आणि लढण्याची ताकद या उपक्रमातून शिकता येणार आहे. याचा राज्यातील शाळकरी व महाविद्यालयीन युवतींनी लाभ घ्यावा. युवतींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे, लढण्याचे प्रशिक्षण या उपक्रमातून दिले जाणार आहे, असे लोढा यांनी सांगितले. मुली आणि महिला यांना स्वरक्षण शिकवण्यासाठी शासनाच्या वतीने १५ जुलैपासून प्रत्येकी तीन दिवसीय स्वरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच समुपदेशन सत्र ठेवलेले आहे.