मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे आज होणार उद्घाटन

रत्नागिरी – ३ जूनला मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन ओडिशामधील रेल्वेदुर्घटनेमुळे रहित करण्यात आले होते. आता या गाडीचे उद्घाटन २७ जूनला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून या  गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या दिवशी एकूण ५ वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन होणार आहे.


कोकण रेल्वेमार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही अती जलद गाडी आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. ही गाडी मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी ही गाडी गोवा येथून धावेल. २७ जून या दिवशी शुभारंभानंतर या गाडीच्या नियमित फेर्‍या २८ जूनपासून चालू होणार आहेत. संभाव्य पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबईहून गोव्याला जातांना ही गाडी पहाटे ५.३२ वाजता सुटेल आणि दुपारी ३.३० वा. मडगाव (गोवा) येथे पोचेल. गोव्याहून परत जातांना मडगावहून दुपारी १२.२० वाजता निघेल आणि रात्री १०.२५ वा. मुंबईला पोचेल. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली या स्थानकावरही या गाडीला थांबा देण्यात आला आहे.