|
कुडाळ – शहर नगरपंचायतीने कुडाळ शहरामध्ये राबवलेल्या भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याच्या मोहिमेचा ठेका कराड येथील ‘वेट्स फॉर ॲनिमल’ या संस्थेला दिला होता. या संस्थेची नोंदणी रहित झाली असून अशा संस्थेला ठेका देऊन भ्रष्टाचार करण्याचा आणि त्या माध्यमातून कुडाळवासियांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सत्ताधारी अन् प्रशासनातील अधिकारी यांनी केला आहे. त्यामुळे या संस्थेसह ठेका प्रक्रियेत सहभागी असलेले नगरपंचायतीतील संबंधित अधिकारी आणि स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी वरिष्ठ स्तरावर करणार आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात कुडाळकर यांनी म्हटले आहे की,
१. कराड येथील ‘वेट्स फॉर ॲनिमल’ या संस्थेची माहिती सातारा येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयाकडे मागितली होती. या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार संबंधित संस्थेने संस्था स्थापन झाल्यापासून म्हणजे वर्ष २००७ पासून कोणत्याही प्रकारचे उपक्रम राबवले नाहीत, तसेच हिशोब सादर केलेला नाही. त्यामुळे या संस्थेची नोंदणी साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशाने २ मे २०१९ या दिवशी रहित केली आहे.
२. त्यामुळे नोंदणी रहित झालेल्या या संस्थेच्या कागदपत्रांची पडताळणी न करता कुडाळ नगरपंचायतीने १ नोव्हेंबर २०२२ या दिवशी या संस्थेशी कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेसाठी करार केला आणि २६ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली.
३. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याविषयी जिल्हा प्रशासनासह स्थानिक प्रशासनाला निवेदनाद्वारे सांगण्यात आले होते; मात्र यावर कोणत्याही प्रशासनाने कारवाई केली नाही.
४. या मोहिमेसाठी नगरपंचायतीच्या स्वनिधीतून खर्च केला जाणार होता, तसेच ९ लाख ४५ सहस्र रुपये या मोहिमेसाठी दिले जाणार होते; मात्र तक्रार अर्ज केल्यानंतर हे देयक थांबवण्यात आले; मात्र त्यानंतर त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.