गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ : किनार्‍यावरील दुकानांत शिरले पाणी

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम !

रत्नागिरी – तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने लाटेचे पाणी थेट किनार्‍यावरील गणपति मंदिराच्या पायर्‍यांपर्यंत पोचले असून येथील दुकानांमध्ये घुसले. या वेळी समुद्रकिनार्‍यावर पर्यटकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला मोठी भरती येण्याची चेतावणी हवामान विभागाकडून देण्यात आली होती. त्याचाच हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह पालटले असण्याची शक्यता वर्तवली जात असून मागील २ दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.

‘बिपरजॉय’मुळे मोसमी पाऊसही उशिरा

‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाचा परिणाम मोसमी पावसावरही झाला आहे. आता हा पाऊस ८ जून या दिवशी केरळमध्ये चालू झाला असून केरळ, लक्षद्वीप, किनारपट्टीचा भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, तमिळनाडू आणि मध्य प्रदेश येथील पुढील काही दिवसांत पडणार आहे. कोकणात सुमारे १३ ते १५ जूनच्या आसपास पाऊस येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाविषयी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे १२ जूनपर्यंत समुद्र खवळलेला रहाणार आहे. तरी ९ ते १२ जून या कालावधीत मासेमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. तसेच जे मासेमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्रकिनारी वेगाने वारे वहाणार असल्याने नागरिक आणि पर्यटक यांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये, कोणत्याही मिळालेल्या बातमीची निश्चिती अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एम्. देवेंदर सिंह यांनी केले आहे.