आर्थिक लवचिकता बळकट करणे, तसेच दक्षिणेकडील देशांमधील समस्यांना वाचा फोडणे हे जी-२० बैठकीचे उद्दिष्ट !
पणजी, ५ जून (पसूका) – देशातील चैतन्यमयी राज्य समजल्या जाणार्या गोव्यात ६ आणि ७ जून असे २ दिवस भारताच्या जी-२० अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थापत्य कृतीगटाची तिसरी बैठक होणार आहे. बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवणार्या फ्रान्स आणि कोरिया प्रजासत्ताक या देशांसह केंद्रीय अर्थ मंत्रालय अन् रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली ही २ दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Tune in for a Media Briefing at the 3rd International Financial Architecture Working Group Meeting in #Goa. #IFAWG
Click here to watch 👇https://t.co/ZGLGNPCLkn
— G20 India (@g20org) June 5, 2023
जी-२० सदस्य राष्ट्रे, निमंत्रित देश, तसेच विविध आंतरराष्ट्रीय संघटनांचे सुमारे १०० प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोव्यात आले आहेत. या बैठकीच्या वेळी जी-२० समूहाच्या भारतीय अध्यक्षतेच्या काळातील अनेक महत्त्वाच्या प्राधान्यक्रम क्षेत्रांचा समावेश असलेली विविध विषयांची सत्रे घेण्यात येणार आहेत. यामध्ये इतर अनेक क्षेत्रांसह २१ व्या शतकातील सामायिक जागतिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी जागतिक आर्थिक संरक्षक जाळ्याचे सशक्तीकरण (जी.एफ्.एस्.एन्.), जागतिक कर्जविषयक असुरक्षिततेच्या समस्येचे समाधान, बहुपक्षीय विकास बँकांचे (एम्.डी.बी.जी.) मध्यवर्ती बँकांच्या डिजिटल चलनांच्या मोठ्या प्रमाणातील आर्थिक परिणामांचे मूल्यमापन करून बळकटीकरण करणे, तसेच शाश्वत भांडवली ओघाच्या माध्यमातून आर्थिक लवचिकतेला भक्कम करणे, यांसारख्या विषयांवर ही सत्रे आधारित असतील.
जी-२० समूहाचा विद्यमान अध्यक्ष म्हणून बैठकीत होणार्या चर्चेच्या वेळी जी-२० समूहात प्रतिनिधित्व नसलेल्या अल्प उत्पन्न गटातील आणि विकसनशील देशांतील, तसेच जगाच्या दक्षिणेकडील देशांमधील समस्यांना वाचा फोडण्याचा आणि त्यावर चर्चा घडवून आणण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
बैठकीच्या पहिल्या दिवशी ६ जून २०२३ या दिवशी शिस्तबद्ध हरित स्थित्यंतराच्या दिशेने गुंतवणूक या विषयीच्या आवश्यकता आणि भांडवली ओघाच्या व्यवस्थापनातील जोखीम या विषयावर उच्चस्तरीय चर्चासत्र होणार आहे.
या बैठकीच्या अनुषंगाने गोवा राज्यभरात लोकसहभागावर आधारित अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये आर्थिक साक्षरता शिबिरे आणि जागृती मोहिमा, कॉईन मेळा, वॉकेथॉन, स्वच्छता अभियान आणि प्रश्नमंजुषा, अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून भारताकडील जी-२० समूहाची अध्यक्षता आणि या अध्यक्षतेच्या काळात भारताने मांडलेली ‘वसुधैव कुटुम्बकम्’ अर्थात् ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेविषयी जागृती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्य्त आले आहे. या बैठकीतील चर्चेविषयी गुजरातमधील गांधीनगर येथे १७ आणि १८ जुलै २०२३ या दिवशी होणार्या जी-२० सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि प्रमुख बँकांचे गव्हर्नर (एफ्.एम्.सी.बी.जी.) यांच्या तिसर्या बैठकीत माहिती देण्यात येईल.