युवावर्गाचे कर्तव्य काय ?

आजच्या युवापिढीला अत्याधुनिक शिक्षणासमवेतच राष्ट्र आणि समाज यांप्रती संस्कारक्षम करणे आवश्यक असते. संस्काररूपी पायावरच मानवी जीवनाची उत्तुंग इमारत उभी करणे शक्य होते. त्यामुळे समाज आणि राष्ट्र सक्षम होण्यास हातभार लागतो; परंतु असे लक्षात येते की, आजच्या बहुतांश युवावर्गाचे ध्येय शिक्षण पूर्ण झाले की, गलेलठ्ठ वेतनाची नोकरी करणे, विवाह करून संसार करणे, सर्व सुखे पायांशी लोळण घेतील, यांसाठी प्रयत्नरत रहाणे, अशीच दिसतात. तरुणांची ही स्थिती पाहिल्यास मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीचा दुष्प्रभाव आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल.

काही जण त्यातही परदेशातील गलेलठ्ठ वेतनाच्या नोकरीतच आपले आयुष्य व्यतित करतात. ज्या देशात आपला जन्म झाला, त्या देशाप्रती आपल्या उत्तरदायित्वाची जाणीवही त्यांना नसते. मुळात म्हणजे पालकांची मनोवृत्तीही अशा प्रकारची झाल्यामुळे ते आपल्या मुलांना घडवण्यास अल्प पडतात. आपल्याला एकीकडे ही स्वार्थी मानसिकता असणारे तरुण/तरुणी आणि त्यांचे पालक, तर दुसरीकडे देशासाठी प्राणांची पर्वा न करता सैन्यदलात भरती होणारे तरुण/तरुणी किंवा देश अन् समाज यांसाठी विधायक कार्य करण्याच्या निष्काम हेतूने स्वतःला समर्पित करणारे तरुण/तरुणी आणि त्यासाठी त्यांना प्रेरित करणारे पालक हेही बघावयास मिळतात. त्यांना काही स्वतःचे आयुष्य नसते का ? पण त्यांनी देशप्रेमाच्या जाणिवेतून हा खडतर आणि प्रतिकूल असा मार्ग निवडलेला असतो. त्यांच्या त्यागाला सीमाच नसते; कारण तेथे किती प्रमाणात प्रतिकूल परिस्थिती असते, याची आपण पंख्याखाली, सोफ्यावर बसून किंवा वातानुकूलित यंत्र असलेल्या खोलीत बसून कल्पनाही करू शकत नाही. देशामध्ये असे दोन गट आहेत. एकीकडे देशासाठी संपूर्ण समर्पण आणि दुसरीकडे स्वसुखाच्या विचारांसाठी देशप्रेमाचा अभाव !

ही संकुचित विचारसरणी घालवण्यासाठी शासकीय स्तरावर काही कालावधीसाठी प्रत्येक युवकाला लष्करी किंवा नागरी संरक्षण प्रशिक्षण अनिवार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे युवक/युवतींना आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या लष्करातील किंवा नागरी संरक्षण दलातील सैनिकांना किती कष्ट सहन करावे लागतात, याची जाणीव होऊन राष्ट्र आणि समाज यांप्रती स्वतःचे उत्तरदायित्व कळेल. एकूणच जगाची स्थिती पाहिल्यास कधीही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रप्रेमाची जाणीव करून देणे आणि करून घेणे आवश्यक आहे !

– सौ. अंजली श्रीकांत पाध्ये, नागपूर