कल्याण, ४ जून (वार्ता.) – आपण नाण्याची एक बाजू पुसली, तर ते नाणे व्यवहारात वापरता येत नाही, तसेच राष्ट्र आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना वेगळे ठेवता येणार नाही, असे मार्गदर्शन ज्येष्ठ लेखक व्याख्याते आणि सावरकर विचारसरणीचे गाढे अभ्यासक श्री. दुर्गेश जयवंत परुळकर यांनी केले. श्री लक्ष्मीनारायण देवस्थान कल्याणच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १६५ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या त्यांच्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
या कार्यक्रमात श्री. दुर्गेश परुळकर आणि डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी लिहिलेल्या ‘सावरकर ज्ञात-अज्ञात’ या ग्रंथाचे प्रकाशन श्री लक्ष्मीनारायण देवस्थानाचे विश्वस्त अधिवक्ता दत्तात्रेय सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.
व्याख्यानात श्री. परूळकर यांनी मांडलेली सूत्रे
१. हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. हिंदूंनी संघटित होणे म्हणजे काय ? हिंदु राष्ट्रात कोणत्याही हिंदूला त्रास झाला असेल किंवा त्रास होत असेल, तर मला झोप लागता कामा नाही. तसे झाल्यासच आपण सांगू शकतो की, हिंदू संघटित आहेत. अन्यथा ती फक्त गर्दी आहे.
२. ‘जसे तानाजी म्हणाले होते, आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ त्याप्रमाणे ‘आधी आपण आपले राष्ट्रकर्तव्य बघायला हवे, मग घरचे दायित्व !’
३. आमचे देव आणि राष्ट्र यांचा जवळचा संबंध आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितले आणि सावरकरांनी ते पोचवले.