पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण !

मंत्रोच्चारांच्या सात्त्विक स्वरांत लोकसभेत सेंगोलची स्थापना : पंतप्रधानांकडून साष्टांग दंडवत

नवे संसद भवन

नवी देहली – केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्पांतर्गत ९७० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे या दिवशी येथे केले. हवन, पूजन यांसाह धार्मिक विधींद्वारे नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कर्नाटकातील प्रसिद्ध शृंगेरी मठाच्या पुजार्‍यांनी वैदिक मंत्रांचा उच्चार केला. यासह गणपति होमही करण्यात आला. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते.

ऐतिहासिक ‘सेंगोल’ची स्थापना !

ऐतिहासिक ‘सेंगोल’ला, म्हणजेच ‘राजदंडा’ला दंडवत घालतांना पंतप्रधान मोदी

या वेळी मंत्रोच्चारांच्या सात्त्विक स्वरांत तामिळनाडूतील शैव पुरोहितांच्या हस्ते  पंतप्रधानांनी ‘सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक’ असलेला ऐतिहासिक ‘सेंगोल’चा, म्हणजेच ‘राजदंडा’चा स्वीकार केला. या वेळी पंतप्रधानांनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. त्यानंतर हा राजदंड लोकसभेच्या अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला स्थापित केला.

राजदंडाचा (‘सेंगोल’चा) इतिहास !

राजदंड अर्थात ‘सेंगोल’

भारतातील राजदंडाचा इतिहास प्राचीन काळापासून शोधला जाऊ शकतो. राजदंडाला तमिळ भाषेत ‘सेंगोल’ म्हटले जाते. याचा अर्थ ‘सत्याला साथ देणारे’, असा आहे. राजदंडाचा पहिला ज्ञात वापर मौर्य साम्राज्याने केला होता. मौर्य सम्राटांनी त्यांच्या विशाल साम्राज्यावर त्यांचा अधिकार दर्शवण्यासाठी राजदंडाचा वापर केला. गुप्त साम्राज्य, चोल साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्य यांनीदेखील राजदंड वापरला होता. ब्रिटिशांनी भारतियांना सत्तेचे हस्तांतरण करतांना तमिळनाडू येथून राजदंड बनवून घेतला होता. वर्ष १९४७ मध्ये ब्रिटिशांनी हा राजदंड भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्याला उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील संग्रहालयात ठेवण्यात आले होते. राजदंड ज्यांच्याकडे सुपुर्द करण्यात येते, त्यांच्याकडून न्यायाची आणि निष्पक्षपाती सरकारची अपेक्षा केली जाते.

देशाची समृद्धी आणि सामर्थ्य यांना नवी गती अन् बळ मिळेल ! – पंतप्रधान

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांमध्ये अभिमान आणि आशा निर्माण करणारी आहे.

ही भव्यदिव्य इमारत लोकांच्या सक्षमीकरणासमवेतच देशाची समृद्धी आणि सामर्थ्य यांना नवी गती अन् बळ देईल, असा मला विश्‍वास आहे’, असे ट्वीट केले.

नवीन संसद भवन १४० कोटी भारतियांच्या आकांक्षा आणि स्वप्न यांचे प्रतिबिंब ! – पंतप्रधान मोदी

नवे संसद भवन ही केवळ एक इमारत नाही, तर १४० कोटी भारतियांच्या आकांक्षा आणि स्वप्न यांचे प्रतिबिंब आहे. हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे, जे जगाला भारताच्या निर्धाराचा संदेश देते. संसदेची ही नवीन इमारत भारताच्या विकासाची हाक देईल. लोकसभेत पवित्र सेंगोलची स्थापनाही करण्यात आली आहे. चोल साम्राज्यात राजदंड हा कर्तव्य आणि सेवा प्रतीक मानले जात होते. आपण या पवित्र राजदंडाची प्रतिष्ठा परत मिळवू शकलो, हे भाग्य आहे. जेव्हा संसदेच्या कार्यवाहीस प्रारंभ होईल, तेव्हा हा राजदंड सर्वांना प्रेरणा देत राहील.

सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन !

नवीन संसदेच्या सभागृहात सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते

या वेळी सर्वधर्मांच्या प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. विविध भाषांत ही प्रार्थना करण्यात आली.

कामगारांचा सत्कार !

या प्रसंगी नव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या बांधकामात सहभागी असलेल्या कामगारांचा सत्कार केला.


विरोधकांचा बहिष्कार !

नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते नव्हे, तर राष्ट्रपतींच्या हस्ते केले पाहिजे, अशी मागणी करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, एम्.आय.एम्. यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला.


तमिळ समाज आणि संस्कृती यांचा अभिमान वाढवल्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार ! – अभिनेते रजनीकांत

‘तमिळ सत्तेचे पारंपरिक प्रतीक असलेला राजदंड भारताच्या नव्या संसदेत शोभून दिसेल.

तमिळ समाज आणि संस्कृती यांचा अभिमान वाढवल्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे खूप खूप आभार’, असे ट्वीट अभिनेते रजनीकांत यांनी केले आहे.

_______________________________

राजकीय मतभेद बाजूला ठेवून नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय एकात्मता दाखवूया ! – अभिनेते कमल हासन

अभिनेते कमल हासन म्हणाले की, या कार्यक्रमाविषयी असलेले मतभेद हे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडले जाऊ शकतात.

नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातील लोकांचे लक्ष आपल्याकडे असेल. आपले राजकीय मतभेद एका दिवसासाठी बाजूला ठेवत नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय एकात्मता दाखवूया.

नव्या संसदेत ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ या ३ द्वारांचा समावेश !

नव्या संसद भवनाची इमारत त्रिकोणी आकाराची असून ती ४ मजली आहे. याचे क्षेत्रफळ ६४ सहस्र ५०० वर्ग मीटर इतके आहे. या संसद भवनाला तीन प्रवेशद्वारे आहेत. ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ अशी या प्रवेशद्वारांची नावे आहेत. यासह सामान्य व्यक्ती आणि महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यासाठी वेगवेगळी प्रवेशद्वारे आहेत. ‘टाटा प्रोजेक्टस लिमिटेड’कडून नव्या संसद भवनाची उभारणी करण्यात आली आहे. या संसद भवनात लोकसभा, राज्यसभा यांसह भव्य संविधान कक्ष, भव्य ग्रंथालय, समिती कक्ष, भोजन कक्ष, वाहन व्यवस्था आदी सुविधा आहेत.

(चित्रावर क्लिक करा)