बाली (इंडोनेशिया) येथे जर्मनीच्या महिलेचा नग्न होऊन मंदिरात प्रवेश

पोलिसांनी कह्यात घेऊन मानसोपचारासाठी रुग्णालयात केले भरती !

प्रतिकात्मक छायाचित्र

बाली (इंडोनेशिया) – येथील एका हिंदु मंदिरामध्ये नग्नावस्थेत प्रवेश करणार्‍या जर्मनीच्या महिला पर्यटकाला अटक करण्यात आली आहे. तिला मानसोपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दारजा तुशिंस्की असे तिचे नाव आहे. ती सरस्वती उबुद मंदिरामधील नृत्याचा कार्यक्रम पहाण्यासाठी आली होती; मात्र तिला तिकीट मिळाले नाही. त्यामुळे तिने कपडे काढून आता प्रवेश केला.

१. पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, महिलेल्या या कृत्यामुळे बालीमधील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. यामुळे मंदिराच्या शुद्धीकरणासाठी विधी करण्यात आला.

२. यापूर्वीही अशाच प्रकारची एक घटना घडली होती. रशियाच्या महिलेने मंदिर परिसरातील पवित्र वडाच्या झाडाखाली नग्न होऊन छायाचित्रे काढली होती. त्यानंतर हिंदूंनी त्याचा विरोध केल्यावर या महिलेला परत रशियामध्ये पाठवून देण्यात आले होते.