‘वैविध्यता, समावेशकता आणि आदर’ यांवर होणार विचारांची देवाण-घेवाण !
२६ मे, फोंडा, गोवा (वार्ता.) – जी-२० परिषदेच्या अंतर्गत २७ मे या दिवशी राज्यातील वास्को येथे ‘सी-२०’ची (‘सिव्हिल २०’ची) परिषद भरत आहे. या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या परिषदेला गोव्याचे पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे आणि सांस्कृतिकमंत्री श्री. गोविंद गावडे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. परिषदेला देश-विदेशांतील मान्यवर संबोधित करणार आहेत. ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि भारतीय विद्या भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य विषय हा ‘वैविध्यता, समावेशकता आणि आदर’ असा असणार आहे.
भारताच्या अध्यक्षतेखालील ‘सी-२०’ची भूमिका !
भारतीय समाजाची ओळख ही नेहमीच परिवर्तनशील आणि विविधांगी राहिली आहे. त्याच्या या एकमेवाद्वितीयत्वाची प्रचीती ही समाजाला सर्वाधिक प्राधान्य देतांनाच वैयक्तिक स्वातंत्र्यावर म्हणजेच स्वायत्ततेवरही भर देण्यातून येते. यामुळेच हा दैवी भारतीय विचार शेकडो नव्हे, तर सहस्रावधी वर्षे टिकला आहे. भारतीय समाज अथवा भारतियत्व हे मंदिरे, धर्मशाळा, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक अन् कल्याणकारी संघटना आदींच्या माध्यमातून अशासकीय स्तरावर पुढाकार घेत सामाजिक सहभागातून सामाजिक समस्यांचे निराकरण करत आले आहे. आत्मनिर्भरता आणि टिकाऊपणा यांमुळे आर्थिक वाढ, पर्यावरणाचे आरोग्य, वैयक्तिक विकास आणि सामाजिक कल्याण हे सर्व हातात हात घालून चालतात, असा भारतियांचा समान विचार अन् विश्वास आहे. सी-२० परिषद याच विश्वासाला जागतिक स्वरूप देण्यासाठी कार्यरत आहे. या माध्यमातून शिक्षण, स्वास्थ्य, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि सेवा या मानवी जीवनाला स्पर्श करणार्या क्षेत्रांतील सामाजिक अन् आर्थिक समस्यांवर उपाय शोधण्यावर भर देण्यात येणार आहे.
जी-२०’चे स्वरूप आणि त्यांतर्गत असलेल्या ‘सी-२०’चे महत्त्व !जी-२० म्हणजेच जगातील २० देशांचा समूह असलेल्या आंतरसरकारी संघटनेची स्थापना ही प्रमुख आर्थिक समस्यांवर जागतिक स्तराचे उपाय काढण्यासाठी करण्यात आली होती. वर्ष १९९९ मध्ये स्थापित जी-२० परिषद आरंभीची ९ वर्षे केवळ आर्थिक समस्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी भरत. यामध्ये २० देशांचे अर्थमंत्री सहभागी होत असत. पुढे वर्ष २००७-०८ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीकडे पहाता या परिषदेमध्ये राष्ट्रप्रमुखही (‘हेड्स ऑफ स्टेट’सुद्धा) सहभागी होऊ लागले. पुढे या परिषदेची व्याप्ती विकसित होत जाऊन ‘व्यापार २०’ (बिझनेस २०), ‘नागरी २०’ (सिव्हिल २०), ‘श्रम २०’ (लेबर २०), ‘संसद २०’ (पार्ल्यामेंट २०), ‘विज्ञान २०’ (सायन्स २०), ‘सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था २०’ (सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स २०), ‘स्टार्टअप २०’, ‘अभ्यास गट २०’ (थिंक २०) आणि ‘शहरी २०’ (अर्बन २०) या विविध क्षेत्रांशी संबंधित कार्य करणार्या अधिकृत गटांची स्थापना झाली. |
यातील ‘सी-२०’ हा गट प्रामुख्याने २० देशांच्या राष्ट्रप्रमुखांना म्हणजेच जागतिक नेत्यांना नागरिक आणि सामाजिक संघटना यांच्या आशा-आकांक्षा यांची ओळख करून देतो. वर्ष २०१३ मध्ये स्थापलेला हा गट जी-२० ला अव्यावसायिक आणि अशासकीय आवाज प्रदान करतो. जागतिक स्तरावरील सामाजिक, अशासकीय, धार्मिक आणि आध्यात्मिक संघटना ‘सी-२०’ परिषदांच्या माध्यमातून एकत्रित येऊन विचारांची देवाण-घेवाण करतात. ‘सी-२०’ गट या नागरी सामाजिक संघटनांना त्यांचे विचार पद्धतशीर रितीने मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. जी-२० चा या माध्यमातून सर्वांचाच सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न आहे.