…ही तर चाचपणी; भविष्यातील धोका ओळखून हिंदूंनी सावध रहावे ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’मध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेवर आधारित ‘विशेष संवाद’ !

मुंबई – नुकतेच संदलच्या (चादर आणि त्यावर हार घालून मुसलमानांनी काढलेली मिरवणूक) निमित्ताने १५-१६ मुसलमानांच्या समूहाने हिंदूंचे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा आणि हिरवी चादर चढवण्याचा केलेला प्रकार ही एक प्रकारची हिंदूंची चाचपणी होती. अशी कृती केल्यावर हिंदू काय प्रतिक्रिया देतात ?, ते मुसलमानांना पहायचे होते. भविष्यात यातून मोठे षड्यंत्र आखले जाऊ शकते. त्यामुळे हिंदूंनी मंदिरांचे रक्षण करण्यासाठी आतापासून सावध असायला हवे, असे आवाहन नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘श्री काळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘मूर्तीपूजेला विरोध करणार्‍या मुसलमानांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न का केला ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

मुसलमानांकडून पूजासाहित्य घेण्यावर बहिष्कार का घालू नये ? – महंत श्री सुधीरदासजी महाराज

महंत श्री सुधीरदासजी महाराज

सौदी अरेबियात कुठेही मजार नाही, तसेच कुठेही संदल निघत नाही. हा प्रकार केवळ भारतात वाढत चालला आहे. त्यातून देशभरात लँड (भूमी) जिहाद चालू आहे. आता हिंदूंच्या मंदिरात घुसून गोंधळ घातला जात आहे. एकीकडे मूर्तीपूजा मानायची नाही, तर दुसरीकडे मात्र मंदिरांच्या नावाने स्वत: व्यवसाय करायचा, हा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे हिंदूंनी अशा लोकांकडून पूजा-प्रसादाचे साहित्य का विकत घ्यावे ? त्यांच्याकडून पूजासाहित्य घेण्यावर बहिष्कार का घालू नये ? याविषयी हिंदूंनी चिंतन करायला हवे.

मुसलमानांनी झालेल्या चुकीसाठी जाहीर क्षमायाचना केली ! – मनोज थेटे, अध्यक्ष, श्री त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ

मनोज थेटे

त्र्यंबकेश्वरमध्ये मुसलमानांची संदल अनेक वर्षांपासून चालू आहे; पण मंदिराच्या आत जाऊन धूप दाखवणे वा चादर चढवण्याची प्रथा कधीच नव्हती. ते लोक रस्त्यावरून जातांना धूप दाखवत असतील; म्हणून ती मंदिराची परंपरा होत नाही. या संदर्भात त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत बोलावलेल्या ग्रामसभेत संबंधित मुसलमानांनी झालेल्या चुकीसाठी जाहीर क्षमायाचना केली आहे.

…तर राममंदिरासाठी हिंदूंना ५०० वर्षे का लढावे लागले ? – आनंद जाखोटिया, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. आनंद जाखोटिया

या घटनेवरून काही प्रसिद्धीमाध्यमे ‘हिंदूंनी या प्रथा-परंपरेचे स्वागत केले आहे; मात्र काही कट्टर हिंदू जाणीवपूर्वक विरोध करत आहेत’ असे चित्र निर्माण केले आहे; पण ही माध्यमे हिंदूंच्या धर्मभावनांचा विचार करत नाहीत. मुसलमानांमध्ये खरेच जर श्री त्र्यंबकेश्वराविषयी एवढी श्रद्धा असेल, तर राममंदिरासाठी हिंदूंना ५०० वर्षे का लढावे लागले ? काशी आणि मथुरा येथील मंदिरे ते हिंदूंच्या स्वाधीन का करत नाहीत ?

‘अहिंदूंना प्रवेश नाही’, असा सूचनाफलक असतांना त्याचे पालन मुसलमान करत नसतील, तर ते कुठल्या प्रथा-परंपरेविषयी बोलत आहेत ? त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसू पहाणारा जमाव मोठा असता आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले नसते, तर काय झाले असते ? याचा शासन अन् हिंदू यांनी गांभीर्याने विचार करायला हवा.