इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात इजिप्तच्या मध्यस्थीने युद्धविराम !

गाझा पट्टीत इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये इजिप्तच्या मध्यस्थीने लढाई थांबली, युद्धविराम लागू

जेरूसलेम (इस्रायल) – इजिप्तने इस्रायल आणि पॅलेस्टाईनची ‘इस्लामिक जिहाद’ संघटना यांच्यामध्ये मध्यस्थी करून युद्धविराम घडवून आणला. गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या हिंसाचारात ३३ पॅलेस्टिनींचा, तर १ इस्रायली नागरिकाचा मृत्यू झाला. इस्लामिक जिहाद संघटनेने इस्रायलवर एक सहस्रांहून अधिक रॉकेट डागले होते. त्यामुळे अनेक इस्रायलींना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. १३ मेच्या रात्री ‘अल-काहेरा’ या इजिप्तच्या वृत्तवाहिनीने माहिती दिली की, रात्री १० वाजल्यापासून युद्धविराम लागू करण्यात आला आहे.

१. या युद्धबंदीच्या संदर्भात ‘इस्लामिक जिहाद’ने सांगितले की, आम्ही या युद्धविरामाचे पालन करण्याची घोषणा करतो. जोपर्यंत इस्रायलकडून आक्रमण होत नाही, तोपर्यंत आम्ही ही बंदी स्वीकारू. इस्रायलने आक्रमण केल्यास आम्ही शांत बसणार नाही.

२. दुसरीकडे इस्रायलच्या सैन्याने ‘अल्-जझीरा’ वृत्तवाहिनीला सांगितले की, ते युद्धविरामाचे मूल्यांकन करत आहेत. यात पंतप्रधान नेतान्याहू आणि संरक्षणमंत्री योव गॅलांट हेसुद्धा उपस्थित रहाणार आहेत.

३. ९ मे या दिवशी इस्रायलच्या हवाई आक्रमणात इस्लामिक जिहादचे ३ वरिष्ठ कमांडर मारले गेले. यानंतर प्रत्युत्तरात पॅलेस्टाईनकडून १ सहस्त्र रॉकेट्स डागण्यात आले.

पॅलेस्टाईनची ‘इस्लामिक जिहाद’ संघटना

पॅलेस्टाईनची ‘इस्लामिक जिहाद’ संघटनेविषयी माहिती !

पॅलेस्टाईनमध्ये ‘इस्लामिक जिहाद’ नावाची संघटना वर्ष १९८१ मध्ये स्थापन झाली. त्याचा आरंभ इजिप्तमध्ये शिकणार्‍या पॅलेस्टिनी मुलांनी केला होता. संघटनेला वेस्ट बँक, गाझा आणि इस्रायलच्या कह्यातील पॅलेस्टाईनची भूमी परत हवी आहे. इस्रायल या संघटनेला इराणचा सहयोगी म्हणतो.