पाकिस्तानमध्ये खलिस्तानी आतंकवादी परमजीतसिंह पंजवर याची हत्या

खलिस्तान कमांडो फोर्स या आतंकवादी संघटनेचा होता प्रमुख !

खलिस्तानी आतंकवादी परमजीतसिंह पंजवर

लाहौर (पाकिस्तान) – खलिस्तान कमांडो फोर्स या खलिस्तानी आतंकवादी संघटनाचा प्रमुख परमजीतसिंह पंजवर याची सनफ्लॉवर सोसायटीमध्ये दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. तो येथे मलिक सरदार सिंह या नावाने रहात होता. वर्ष १९९० मध्ये त्याने पाकमध्ये आश्रय घेतला होता. तो पसार आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये ८ व्या क्रमांकावर होता. तो मूळचा पंजाब राज्यातील तरनतारन जिल्ह्यातील पंजवार गावाचा रहिवासी होता. ‘त्याची हत्या कुणी आणि का केली ?’, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याला पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.चे संरक्षण होते. तरीही त्याची हत्या होणे आश्‍चर्यजनक म्हटले जात आहे.

१. परमजीतसिंह पंजवर पाकिस्तानमधून ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये अमली पदार्थ आणि शस्त्रे यांची तस्करी करत होता. त्यातून मिळणार्‍या पैशांतून तो त्याची आतंकवादी संघटना चालवत होता. त्याची पत्नी आणि मुले जर्मनीमध्ये रहातात. पाकिस्तान नेहमीच ‘परमजीत सिंह आमच्या देशात रहात नाही’, असे सांगत होता.

२. ऑक्टोबर २०२० मध्ये पंजाबच्या तरनतारन येथे शौर्यचक्र विजेता बलविंदरसिंह संधू याची हत्या करण्यात आली होती. त्यात परमजीत याचा हात होता. तसेच ३० जून १९९९ या दिवशी परमजीत याने चंडीगड येथे पारपत्र कार्यालयाजवळ बाँबस्फोट घडवून आणला होता.