(म्हणे) ‘भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे मुसलमानविरोधी धोरणांना प्रोत्साहन !’ – पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो

पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचे भारताविरुद्ध विषारी फुत्कार !

पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो

इस्लामाबाद – पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पाकिस्तानात  परतताच भारताच्या विरोधात विष ओकले आहे. भुट्टो यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्यावर फुकाची टीका केली. ते म्हणाले, ‘भारतीय मंत्री भाजपच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतात, जे मुसलमानविरोधी धोरणांना प्रोत्साहन देतात. तसेच भारतीय सत्ताधारी पक्ष आणि ‘आर्.एस्.एस्.’ मला आणि प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला ‘आतंकवादी’ घोषित करू इच्छित आहे.’ भुट्टो शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्रमंत्र्यांच्या २ दिवसीय परिषदेत सहभागी होण्यासाठी ४ मे या दिवशी भारतात आले होते.

१. बिलावल भुट्टो यांनी सांगितले, ‘काश्मीरविषयी मी सदस्य देशांसमोर तत्त्वत: भूमिका मांडली. काश्मीरविषयी पाकच्या भूमिकेत कोणताही पालट झालेला नाही. जोपर्यंत भारत त्याचा एकतर्फी निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही.

२. ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या भारताच्या निर्णयानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखीनच बिघडले आहेत.

३. भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भुट्टो यांचे वर्णन ‘आतंकवादी देशाचे प्रवक्ते’ अशा शब्दांत केले होते. तसेच काश्मीरच्या सूत्रावर भारत पाकिस्तानशी चर्चा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

संपादकीय भूमिका 

भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी वारंवार पाकला आरसा दाखवला आहे. त्यामुळे भुट्टो यांनी त्यांच्या नावाने थयथयाट केल्यास आश्‍चर्य ते काय ?