उत्‍क्रांती तत्त्व प्रदान करणारे भगवान कूर्मदेव !

आज ‘कूर्म जयंती’ आहे. भगवान कूर्मदेवांच्‍या चरणी कोटी कोटी प्रणाम !

कूर्म जयंती

‘वैशाख पौर्णिमा या दिवशी देवदानवांचे समुद्रमंथन यशस्‍वी व्‍हावे म्‍हणून भगवान विष्‍णूंनी कूर्मावतार धारण केला. कूर्म (कासव) हा विष्‍णूचा दुसरा अवतार ! या अवताराचे मूळ शतपथ ब्राह्मणात सापडते. प्रजापतीने कूर्माचे रूप धारण करून प्रजोत्‍पत्ती केल्‍याची कथा त्‍यात आहे. त्‍यानंतर सत्‍ययुगात विष्‍णूंनी ‘प्रलयकाळी हरवलेल्‍या काही अमौलिक वस्‍तू पुन्‍हा मिळवण्‍यासाठी कूर्माचा अवतार घेतला आणि मंदर पर्वताखाली क्षीरसमुद्रात तो अढळ राहिला. त्‍यानंतर दैत्‍यांनी वासुकीचा दोर करून समुद्रमंथन केले आणि १४ रत्ने बाहेर काढली’, अशी माहिती ‘ज्ञानकोश’कार देतात.

अत्‍यंत उंच असणार्‍या आणि सुवर्णशृंगांनी वेढलेल्‍या मेरु पर्वतावर देव रहात असतांना त्‍यांना अमृतप्राशनाची इच्‍छा झाली. त्‍यासाठी सर्व देव तपश्‍चर्या करू लागले. शेवटी नारायणाने उपाय सुचवला, ‘देव आणि असुर यांनी समुद्राचे मंथन करावे म्‍हणजे अमृताचा लाभ होईल.’ त्‍याप्रमाणे समुद्रमंथन चालू झाले. समुद्रमंथनाचे कारण इतरत्र दुसरेही सांगितले आहे. दैत्‍य-देवतांच्‍या युद्धात दैत्‍यांनी देवतांची सर्व संपत्ती समुद्रात टाकली. ती बाहेर काढण्‍यास समुद्रमंथन चालू झाले. एवढा मोठा सागर घुसळण्‍यास रवी कोणती ? मंदर पर्वताची रवी करून वासुकी सर्पास दोर करण्‍यात आले आणि मंथन चालू झाले. तो मंदर पर्वत समुद्राच्‍या तळाशी जाऊ लागला. सर्व देवांनी पुन्‍हा नारायणाची प्रार्थना केली. तेव्‍हा भगवान विष्‍णूंनी कूर्माचे रूप धारण करून तो मंदर पर्वत आपल्‍या पाठीवर धारण केला. त्‍यानंतर समुद्रमंथन यशस्‍वी झाले. सर्व देवांना विष्‍णूंनी आपले बल दिले, तेव्‍हा मंथनातून सूर्य, चंद्र, लक्ष्मी, कौस्‍तुभ, पारिजात, अमृत इत्‍यादी १४ रत्ने बाहेर आली. असे म्‍हटले जाते की, मत्‍स्‍य अवतारानंतर भगवंताने कूर्माचा अवतार धारण केला, यात उत्‍क्रांती तत्त्व आहे.’

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))