पुणे – अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २१ एप्रिल २०२३ या दिवशी कोथरूड येथील सौ. सरोज कर्णिक (वय ८० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. पुणे येथील सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी कोथरूड येथे एका अनौपचारिक कार्यक्रमात ही घोषणा केली. या वेळी सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते सौ. सरोज कर्णिक यांचा सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सौ. कर्णिक यांचे पती श्री. श्रीनिवास कर्णिक आणि कोथरूड येथील साधक उपस्थित होते. या वेळी सौ. कर्णिक आणि उपस्थित साधक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चैतन्यमय वातावरणात झालेल्या कार्यक्रमामध्ये सर्वांचा भाव दाटून आला होता.
प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केली की, ते कुणाला तरी साहाय्याला पाठवतात ! – सौ. सरोज कर्णिकप.पू. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) नाव घेतले तरी भावाश्रू येतात. ते सतत माझ्या समवेत असतात. माझा हात धरून मला सेवेला घेऊन जातात. कधी सत्संगाला जायला कुणी नसेल, तर प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केली की, लगेच ते कुणाला तरी पाठवतात. एकदा रेल्वेस्थानकावर पुष्कळ गर्दी होती. प्रार्थना केली आणि सर्व रस्ता मोकळा झाला. मी सहजपणे रेल्वेत चढून सेवेला जाऊ शकले. घरच्या मोलकरणीला नामजप करायला सांगितला, त्यानंतर तिच्या पतीला आणि भावाला नोकरी लागली. रिक्शावाल्यांना साधना सांगितली. एकदा सेवेसाठी घेतलेले ३ सहस्र रुपयांचे ग्रंथ मी रिक्शात विसरले. त्यामुळे मी त्या ग्रंथांचे पैसे भरायचे ठरवले. त्यानंतर एक मासाने त्या रिक्शावाल्याने सर्व ग्रंथ परत आणून दिले. (हे सांगतांना सौ. कर्णिक यांचा भाव दाटून आला होता.) |
सौ. सरोज कर्णिक यांच्यामध्ये गुरूंवर अढळ श्रद्धा आणि प्रेमभाव असल्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली ! – सद़्गुरु स्वाती खाडये
सद़्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘सौ. सरोज कर्णिक यांच्यामध्ये भाव, सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवरील अढळ श्रद्धा आणि प्रेमभाव आहे. त्यामुळे त्यांनी आज ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.’’
या वेळी उपस्थित साधकांना मार्गदर्शन करतांना सद़्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘ नामजप आणि स्वभावदोष-अहं निर्मूलन प्रक्रिया यांमुळे अंतर्बाह्य शुद्धी होते. दिवसभर आनंदी रहाण्यासाठी भाव निर्माण करायला हवा. यासाठी भावजागृतीचे प्रयत्न सर्वांनी केले पाहिजेत; कारण ‘भाव तेथे देव’ आहे.’’ या वेळी सद़्गुरु स्वाती खाडये यांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भावपूर्ण सेवा कशी करावी ?’ याविषयीही मार्गदर्शन केले.
माझी पत्नी सर्व साधकांवर अतिशय प्रेम करते ! – श्री. श्रीनिवास कर्णिक (सौ. सरोज कर्णिक यांचे पती)
माझी पत्नी सर्व साधकांवर अतिशय प्रेम करते. सर्वांची विचारपूस करणे, काळजी घेते, असा प्रेमळ स्वभाव आहे. त्यांना साधनेची तीव्र तळमळ आणि प.पू. गुरुदेवांच्या प्रती अतिशय श्रद्धा आहे.
श्री. महेश पाठक – सौ. कर्णिक आम्हा सर्व साधकांना मुलांप्रमाणे प्रोत्साहन देतात आणि सर्वांना ‘साधना करून पुढे जा’, असे सतत सांगतात.
श्री. नारायण पाटील – सौ. कर्णिककाकू अतिशय प्रेमळ आहेत. भ्रमणभाषवर ‘ऑनलाईन’ सत्संग लावणे जमत नसेल, तर साधकांनाविचारून त्या सत्संग ऐकतातच. एवढी तळमळ आहे.
सौ. मीनाक्षी पाटील – काकू स्वतः लहान होऊन इतर साधक साधनेचे काय प्रयत्न करतात, ते विचारून घेतात. त्यानुसार प्रयत्नही करतात.
सौ. वृंदा सटाणेकर – काकूंचे मन अतिशय निर्मळ आहे. त्या नेहमी साधकांचे कौतुक करतात.
पुणे येथील सौ. सरोज कर्णिक (वय ८० वर्षे) यांची संत आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. पू. (सौ.) मनीषा पाठक, पुणे.
१ अ. इतरांचा विचार करणे : ‘माझी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू झाल्यावर मला कर्णिककाकूंचा पुष्कळ सत्संग लाभला. तेव्हा मी शिक्षणासाठी वसतीगृहात रहात असे. आर्थिक अडचणींमुळे मला सेवेला जातांना रिक्शा करणे किंवा वाहनात इंधन भरणे शक्य नसायचे. त्यामुळे मी सर्वत्र चालत जायचे. माझी ही अडचण काकूंना न सांगताही कळायची. मी सेवेला कुठे चालत जातांना दिसल्यावर त्या स्वतःहून रिक्शा करून मला त्यांच्या समवेत घेऊन जात आणि सेवा झाल्यावर पुन्हा वसतीगृहात आणून सोडत असत.
१ आ. कर्णिककाकू त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकालाच दत्तगुरु आणि कुलदेवता यांचा नामजप करण्यास आवर्जून सांगतात.
१ इ. कर्णिककाकूंचा प.पू. गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती) पुष्कळ भाव आहे. गुरुदेवांचे नाव काढले, तरी त्यांच्या डोळ्यांत पाणी येते.
१ ई. जाणवलेला पालट : आधी कर्णिककाकू ‘भावनाशीलता आणि प्रसंगात अडकणे’ यांमुळे साधनेच्या एकाच टप्प्यावर अडकल्या आहेत’, असे मला वाटायचे. आता त्याचे प्रमाण उणावले आहे. आता त्यांच्या मनात काळजी किंवा चिंता नसते. ‘जे काही होईल, ते गुरुदेवच करून घेणार आहेत’, अशी त्यांची श्रद्धा वाढली आहे. आधीच्या तुलनेत काकू पुष्कळ आनंदी दिसतात.
२. सौ. प्रीती कुलकर्णी, पुणे
२ अ. परिस्थिती स्वीकारणे : ‘उतारवयातही श्री. कर्णिककाका आणि सौ. काकू (दोघांचेही वय ८० वर्षे) दोघेच घरी असतात, तरीही काकू सतत आनंदी आणि उत्साही असतात. त्यांनी ती परिस्थिती मनापासून स्वीकारली आहे.
२ आ. संपर्कात येणार्या प्रत्येकाला साधना सांगणे : कर्णिककाकू भेटणार्या प्रत्येक व्यक्तीला साधना सांगतात. त्या रिक्शाने प्रवास करतांना रिक्शावाल्यालाही साधना सांगतात.
२ इ. सेवेची तळमळ
२ इ १. उतारवयातही सेवा करणे : कर्णिककाकूंनी पूर्वी ‘अंक वितरण, पंचांग वितरण, ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, वर्गणीदारांचे नूतनीकरण करणे’, अशा अनेक सेवा झोकून देऊन केल्या आहेत. आता वयामुळे त्यांच्या सेवा करण्यावर मर्यादा आल्या असल्या, तरीही त्यांना शक्य होतील, त्या सेवा (पंचांग वितरण किंवा हस्तपत्रकांचे वितरण) करण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न असतो.
२ इ २. ‘साधकांची भेट आणि सेवा व्हावी’, यासाठी चतुःशृंगी मंदिराच्या पुष्कळ पायर्या चढून सेवेसाठी येणे : वर्ष २०२२ मधील नवरात्रीत कर्णिककाकू चतुःशृंगी येथे प्रदर्शनकक्षावर सेवेसाठी येणार होत्या. मी त्यांना म्हणाले, ‘‘आता तुमचे वय झाले आहे. मंदिरात जायला पुष्कळ पायर्या चढून जावे लागते. तुम्ही आला नाहीत, तरी चालेल.’’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘मला साधक भेटतील, थोडी सेवा होईल आणि आनंद मिळेल.’’ असे म्हणून त्या सेवेला आल्या.
३. सौ. रश्मी नाईक, पुणे
अ. ‘कर्णिककाकूंमध्ये व्यवस्थितपणा हा गुण आहे. त्यांचे घर नीटनेटके आणि स्वच्छ असते.
आ. त्या सर्वांविषयी नेहमी चांगलेच बोलतात. त्यांचे कुणाविषयी कधी गार्हाणे नसते.’
४. सौ. नीता साळुंखे, पुणे
४ अ. सेवेची तळमळ
१. ‘पुण्याजवळ भूगाव नावाचा एक भाग आहे. कर्णिककाकू तिथे प्रसार करण्यासाठी नियमित येत असत. तेव्हा त्यांचे वय ६५ वर्षे होते.
२. वयाच्या ७५ व्या वर्षीही त्या मला म्हणायच्या, ‘‘मला तुझ्यासह विज्ञापने मिळवण्याची सेवा शिकायला यायचे आहे.’’
सर्व सूत्रांचा दिनांक (१३.३.२०२३)