बृजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा नोंदवू !

  • महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण

  • देहली पोलिसांनी न्यायालयात दिली माहिती !

नवी देहली – भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर आजच म्हणजे २८ एप्रिल या दिवशी गुन्हा नोंदवण्यात येईल, अशी माहिती देहली पोलिसांकडून २८ एप्रिल या दिवशी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. ७ महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली होती; मात्र महासंघ आणि क्रीडा मंत्रालय यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली.

बृजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन चालू रहाणार ! – कुस्तीपटूंचा निर्धार

दुसरीकडे बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई होण्यासाठी येथील जंतरमंतरवर  धरणे आंदोलन करणार्‍या भारतीय कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेऊन मागणी केली की, जोपर्यंत बृजभूषण शरर सिंह यांना पदावरून हटवण्यात येत नाही, त्यांना कारागृहात टाकले जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. ते या पदावर राहिल्यास पदाचा दुरुपयोग करू शकतात. ही लढाई केवळ गुन्हा नोंदवण्यापुरती नाही. अशा लोकांपासून खेळाला वाचवले पाहिजे.

संपादकीय भूमिका

जर हे शक्य होते, ते गेले काही मास देहली पोलिसांनी गुन्हा का नोंदवला नाही, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यायला हवे ! तसेच ते आता केवळ गुन्हा नोंदवून त्याकडे दुर्लक्ष करणार कि पुढील कारवाईही करणार, हेही स्पष्ट केले पाहिजे !