गोव्यात समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांकडून सुरक्षेसंबंधी सूचनांचे सर्रासपणे उल्लंघन

अतीउत्साह आणि रोमांच अनुभवणे यांमुळे समुद्रात वर्ष २०१९ पासून ३६ जण बुडाले !

अतीउत्साह आणि रोमांच अनुभवणे यांमुळे ‘नो सेल्फी झोन’ असलेल्या ठिकाणीही सेल्फी काढणारे देशी पर्यटक

पणजी, २७ एप्रिल (वार्ता.) – केरी, पेडणे येथे ‘नो सेल्फी झोन’ (‘सेल्फी’ काढण्यास मनाई आहे.) या सूचनाफलकाकडे दुर्लक्ष करून ‘सेल्फी’ काढायला गेल्याने हल्लीच ४ जणांचा बुडून मृत्यू झाला. वर्ष २०१९ पासून अतीउत्साह आणि काही क्षणांचा रोमांच अनुभवणे, यांमुळे सुरक्षेसंबंधी सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर विविध घटनांमध्ये ३६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये चालू वर्षाच्या ४ मासांत ६ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांचाही समावेश आहे. सर्व घटनांमध्ये बहुतांश देशी पर्यटकांचा समावेश आहे.

वर्ष २०१८ मध्ये समुद्रकिनार्‍यावर बुडून मृत्यू पावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सरकारने समुद्रकिनार्‍यांवर जीवरक्षक एजन्सीची नियुक्ती केली आणि एकूण २४ ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ (‘सेल्फी’ काढण्यास मनाई आहे), तसेच पोहण्यास मनाई असलेल्या ठिकाणी तसा सूचनाफलक लावून त्या ठिकाणी लाल झेंडे लावण्यात आले. काही ठिकाणी खडकाळ भाग असल्याचेही सूचना फलकही लावण्यात आले. ‘सेल्फी’ घेणे किंवा समुद्रात पोहणे यांच्या नादात सुरक्षेसंबंधी सूचनांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केल्याने बुडून मृत्यू पावण्याच्या घटना घडल्या आहेत.

सध्या समुद्रकिनार्‍यांवर ‘दृष्टी लाईफगार्ड एजन्सी’ यांचे सुमारे ४५० जीवरक्षक विविध समुद्रकिनार्‍यांवर नेमण्यात आलेले आहेत आणि या जीवरक्षकांसाठी समुद्रकिनार्‍यांवर ठिकठिकाणी ३५ मनोरे उभारण्यात आले आहेत.

‘दृष्टी लाईफगार्ड एजन्सी’च्या जीवरक्षकांना स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजावावी लागतेच, तसेच सुरक्षा सूचनांचे पालन करण्यास सांगितल्यानंतर पर्यटकांचा रोषही सहन करावा लागतो. ‘दृष्टी लाईफगार्ड एजन्सी’ने वर्ष २०१८ पूर्वीही काही काळ समुद्रकिनार्‍यांवर सेवा बजावली आहे आणि आतापर्यंत ६ सहस्र जणांचा जीव वाचवला असल्याचा त्यांचा दावा आहे.