आज पुणे येथील श्री शंकर महाराज पुण्यतिथी आहे. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
१. श्री शंकर महाराज यांचा जन्म आणि पूर्व इतिहास
श्री शंकर महाराज यांनी पुढे एकदा म्हटले होते, ‘आम्ही कैलासाहून आलो !’ नावही ‘शंकर’ ! ते खरोखरच शिवाचे वैराग्य-संपन्न अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे चिमणाजी नावाचे गृहस्थ रहात होते. त्यांच्या पत्नीच्या पोटी मूल-बाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला, ‘रानात जा. तुला बाळ मिळेल. ते घेऊन ये.’ ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हे २ वर्षांचे बाळ मिळाले. भगवान शंकराचा प्रसाद म्हणून त्यांनी त्याचे नाव ‘शंकर’ ठेवले. ‘शंकर’ या माता-पित्यांजवळ काही वर्षे राहिला. नंतर या बाळाने माता-पित्यांनाच आशीर्वाद दिला, ‘‘तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल !’’ असा आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला. सद्गुरु शंकर महाराजांचे ना नेमके एक नाव, ना रूप, ना एक स्थान ! ते अनेक नावांनी वावरत. ‘शंकर’ या नावाप्रमाणेच ‘सुपड्या’, ‘कुंवरस्वामी’, ‘गौरीशंकर’, अशा विविध नावांनीही ते ओळखले जात. त्यांचे ‘नाव’ जसे एक नाही, तसेच त्यांचे ‘रूप’ही ! काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘अष्टावक्र’ असाही केलेला आढळतो. त्यांचे डोळे मोठे आणि ते अजानुबाहू होते. त्यांची गुडघे वर करून बसण्याची पद्धत होती.
२. वैराग्यसंपन्न श्री शंकर महाराज
श्री शंकर महाराज कधीही एका स्थानी नसत. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक, नगर, पुणे, भाग्यनगर (हैद्राबाद), तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल, अशा स्थानी त्यांची भटकंती असायची. याचाच अर्थ श्री शंकर महाराजांचे ‘नाम-रूप-स्थान’ सांगणे कठीण आहे; कारण खर्या अर्थाने ते वैराग्यसंपन्न होते; म्हणूनच ते ‘शंकर’ होते.
३. श्री शंकर महाराजांनी ताईसाहेब मेहेंदळे यांच्या गळ्याला स्पर्श करून ‘ज्ञानेश्वरी’ सांगण्यास सांगणे
पुण्यात अप्पा बळवंत चौक प्रसिद्ध आहे. अप्पा बळवंत मेहेंदळे यांचा वाडा चौकातच होता. सरदार मेहेंदळे यांचा वाडा होता; म्हणून त्या चौकाचे नाव ‘अप्पा बळवंत चौक !’ बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या लढाईत लढले होते. त्या वेळी ‘अप्पा बळवंत’ हा केवळ १२ वर्षांचा होता. मेहेंदळे यांच्या घराण्यातील प्रवचनकार ‘ताईसाहेब मेहेंदळे’ श्री शंकर महाराजांमुळे प्रसिद्धीस आल्या.
एक दिवस श्री शंकर महाराजांनी ताईसाहेब मेहेंदळे यांच्या गळ्याला बोटाने स्पर्श केला नि सांगितले, ‘‘ज्ञानेश्वरी सांग.’’ तेव्हापासून ताईसाहेब ‘ज्ञानेश्वरी’वर प्रवचने करू लागल्या. त्या प्रवचन करतांना त्यांच्या मुखातून साक्षात् सरस्वती अवतरायची. त्या ज्ञानेश्वरी सांगत; पण तिची काव्यमयता, शास्त्रीयता, वैचारिक सुसंगती नि झेप त्यांच्या प्रवचनांतून अनायासे प्रकट होई. विशेष असे की, त्यांचे पतीही त्या सांगत असलेली ज्ञानेश्वरी ऐकायला बसत. ताईसाहेब मेहेंदळ्यांची प्रवचने ऐकायला काही वेळा स्वतः श्री शंकर महाराजही येत. मेहेंदळे पती-पत्नीची श्री शंकर महाराजांवर अगाध श्रद्धा होती.
(साभार : www.dattamaharaj.com संकेतस्थळ)
श्री शंकर महाराजांची मनोभूमिका (शिकवण)श्री शंकर महाराजांची पारमार्थिक वैराग्यसंपन्न मूर्ती केवढ्या उच्च भूमिकेवर होती, ते त्यांच्या एका सहज उद्गारातून दिसते. ते म्हणाले होते, ‘‘मला काही कमी नाही; कारण मला कमावण्यासारखे काही नाही आणि माझ्याजवळ काही नाही; म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही.’’ १. सुख-शांती हवी असेल, तर इच्छा, ईर्षा, असुया, महत्त्वाकांक्षा, हावरेपणा सोडून दिल्याने अहंकाराने सतत अस्थिर होणारे मन स्थिर होईल. २. सामाजिक-धार्मिक-नैतिक अधिष्ठान गुरूंमुळे प्राप्त होते; पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागल्याने सत्य-नीती हा धर्म होण्याऐवजी ‘पैसा’ हा धर्म झाला आहे. गुरूंना ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे. ३. गुरु आणि देव यांविषयी उत्कट प्रेम अन् दृढ श्रद्धा हवी. ४. जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भजतात. त्यांचाच गुरुकृपेने उद्धार होतो. ५. ‘देव सर्वव्यापी आहे’, असे लोक मानतात; पण जे बोलतात ते आचरणात आणत नाहीत. प्रथम आत्मबोध करावा, तरच आत्मसाक्षात्कार घडून येईल. ६. साधनमार्गात अपेक्षा आणि पूर्ती महत्त्वाची असते; पण त्यासाठी विश्वास अन् श्रद्धा हवी. विद्वत्तेने देवाला जोखू (पारखू) नये. विद्वान मंडळींना शंकाच फार येतात. त्यासाठी त्यांनी आपल्याच अंतरंगात डोकावून पहावे. त्यायोगे शंका नाहीशा होऊन कार्यप्रवृत्तीची प्रेरणा मिळते. ७. स्वार्थीपणाचा बाजार भरला आहे. त्यातूनच अपेक्षा वाढतात. स्वार्थासाठी मित्राला साहाय्य, कीर्तीसाठी दानधर्म, कौतुकासाठी देणगी मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की, लगेच राग येतो. तोच मुळी आत्मकल्याणाच्या आड येतो. ८. आशा, इच्छा, हव्यास, वित्त यांची हाव कधीच संपत नाही. मग त्यापोटी दु:ख-वेदना होणारच. बोटीतून प्रवास म्हटला की, बोट हलणारच. मूल हवे, तर प्रसूतीचा त्रास सोसलाच पाहिजे. शरीर म्हटले की, व्याधी आलीच. ९. जे आत्मदर्शनाची प्राप्ती करून घेतात, त्यांना जन्म-मृत्यू नसतो. ते ‘जगद्उद्धारार्थ अवतार’ म्हणून पुन्हा येतात. १०. सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ. ११. सद्गुणांची वाढ झाली, तर माणसात देवत्व प्रकट होते. १२. आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत. लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे आलो. मनुष्य जन्म आहे तोवरच हे समजून घ्या. आत्मकल्याण करून घ्या. जीवनाचे सार्थक करा.’ |