प्रसिद्धीचा हव्यास ?

प्रतिकात्मक छायाचित्र

एका मराठी अभिनेत्रीने तिच्या आई-वडिलांच्या वैयक्तिक क्षणांविषयी केलेले एक विधान चांगलेच गाजत आहे. ‘त्यांचे वैयक्तिक क्षण आम्ही पाहिलेले आहेत’, असे तिने म्हटले. खरेतर कुणीही आपल्या आई-वडिलांच्या संदर्भात अशा विषयांवर उघडपणे वाच्यता करत नाही. याला कारण ‘संस्कृती’ आणि ‘नैतिकता’ आहे. या दोन्ही गोष्टी काही प्रमाणात शिल्लक आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाची विधाने कुणीही बिनधास्तपणे करत नाही. आपण आई-वडिलांच्या संदर्भात काय म्हणतो ? तर ‘त्यांनी आपल्याला कसे घडवले, कसे शिकवले, लहानाचे मोठे कसे केले ?’, इत्यादी, तसेच याच्या जोडीला मातृ-पितृऋण यांविषयीही सर्वजण चर्चा करतात; पण कुणी काही विचारलेले नसतांना ‘आई-वडिलांचे वैयक्तिक क्षण पाहिले’, असे सांगण्याची या अभिनेत्रीला आवश्यकताच काय ? आई-वडिलांविषयी अशा प्रकारे सांगणे, यावरून तिने सुसंस्कृतपणा सोडलेला आहे, हे लक्षात येते. आई-वडिलांचा मान-सन्मान करणे तर दूरच; पण कोणत्या खासगी गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या, हेही न कळणे याला स्वतःची अक्कल पाजळण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. या सर्वांमागे केवळ प्रसिद्धीचा हव्यास हाच एकमात्र हेतू असावा. ‘आपण पुढारलेल्या विचारांचे आहोत’, हे दाखवण्यासाठी म्हणून हा सगळा खटाटोप !

आम्हालाही ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ आहे, या ‘गोंडस’ नावाखाली काहीही बोलत सुटायचे; पण अशाने व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होते, ती कोण रोखणार ? हिंदु धर्मात आई-वडिलांना पूजनीय मानले जाते. असे असतांना त्यांच्या संदर्भात अशी विधाने करून स्वतःच्या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन घडवणार्‍यांना समाजातील जनतेने वेळीच खडसवायला हवे. आज या अिभनेत्रीने आई-वडिलांविषयी केलेले वक्तव्य उद्या कुणी स्वतःच्या आजी-आजोबांविषयी वक्तव्य केले, तर आपण काय करणार आहोत ? ही संस्कारहीनतेच्या दिशेने होणारी वाटचालच आहे. अनेकांकडून अशी बेताल विधाने केली जातात आणि प्रसिद्धीमाध्यमेही त्यांना प्रसिद्धी देतात. यातून ना समाजभान जोपासले जाते, ना समाजकर्तव्य पार पाडता येते. यातून संस्कृतीची लक्तरेच केली जातात. अशा विधानांना आळा बसला पाहिजे.

अभिनेत्रीच्या विधानाला बहुतांश नेटकर्‍यांनी विरोधच केला आहे. समाजाला जे कळते, ते अभिनेत्रीला कळत नाही, हे लज्जास्पद आहे. ‘आपण अभिनय किंवा मनोरंजन करतो, तर समाजाशी तितकेच बांधील आहोत’, याचे भान प्रत्येक अभिनेत्रीने बाळगायला हवे.

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.