हरहुन्‍नरी कलाकार असूनही अल्‍प अहं असलेले आणि उत्तम स्‍मरणशक्‍तीची देणगी लाभलेले पणजी (गोवा) येथील नाट्यवर्य पद्मश्री श्री. प्रसाद सावकार (वय ९४ वर्षे) !

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्‍हणून पृथ्‍वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्‍या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्‍या स्‍तराच्‍या असतात !’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले   

२०.१२.२०२२ या दिवशी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत आणि नाट्य या कलांशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी नाट्यवर्य पद्मश्री श्री. प्रसाद सावकार (वय ९४ वर्षे) यांची त्‍यांच्‍या पणजी (गोवा) येथील निवासस्‍थानी सदिच्‍छा भेट घेतली. या वेळी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या संगीत समन्‍वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्‍यासह महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या नाट्य अभ्‍यासिका सौ. शुभांगी शेळके (एम्.ए. नाट्यशास्‍त्र) आणि कु. रेणुका कुलकर्णी उपस्‍थित होत्‍या. श्री. प्रसाद सावकार यांच्‍याशी संवाद साधतांना त्‍यांनी आम्‍हाला त्‍यांच्‍या अभिनय क्षेत्राच्‍या कारकिर्दीतील अनेक अनुभव सांगितले. त्‍यामधून साधकांना या नाट्यकलेमधील बारकावे शिकता आले. त्‍या वेळी साधकांना जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे आणि श्री. सावकार यांची काही गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. प्रसाद सावकार

१. श्री. प्रसाद सावकार आणि त्‍यांचे कुटुंबीय यांनी प्रेमाने स्‍वागत करून साधकांचे आदरातिथ्‍य करणे

आम्‍ही श्री. प्रसाद सावकार यांच्‍या घरी गेल्‍यावर आमची त्‍यांच्‍याशी ओळख नसतांनाही त्‍यांनी आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांनी आमचे प्रेमाने स्‍वागत केले. त्‍यांनी आमची आपुलकीने विचारपूस केली. त्‍यांचे हसतमुख चेहरे आणि मनमोकळेे सहज बोलणे अन् वागणे यांमुळे आम्‍हाला अल्‍पावधीत त्‍यांच्‍याविषयी जवळीक वाटू लागली. त्‍यांच्‍या आनंदी आणि बोलक्‍या स्‍वभावामुळे पहिल्‍या भेटीतच त्‍यांनी आम्‍हाला आपलेसे केले.

२. कलेवरील निःस्‍वार्थ प्रेम आणि आनंदी अन् उत्‍साही स्‍वभाव यांमुळे वयाच्‍या ९४ व्‍या वर्षीही श्री. सावकार यांचे स्‍वास्‍थ्‍य चांगले असणे

श्री. प्रसाद सावकार यांचे वय ९४ वर्षे असूनही ईश्‍वराच्‍या कृपेने त्‍यांचे स्‍वास्‍थ्‍य चांगले आहे. ‘त्‍यांनी अनेक दशके कलेची निःस्‍वार्थ उपासना केली आहे. त्‍यांचे कलेवरील निःस्‍वार्थ प्रेम आणि आनंदी अन् उत्‍साही स्‍वभाव यांमुळेच त्‍यांचे स्‍वास्‍थ्‍य चांगले राहिले आहे’, असे आम्‍हाला जाणवले.

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

३. उत्तम स्‍मरणशक्‍ती

त्‍यांच्‍या कलाक्षेत्रातील आठवणी सांगतांना ते ती घटना जणू काल-परवा घडल्‍यासारखी सांगत होते. घटनेचे दिनांक, ठिकाण, व्‍यक्‍तींची नावे इत्‍यादी गोष्‍टी या वयात अजूनही त्‍यांच्‍या स्‍मरणात आहेत. नवल म्‍हणजे अजूनही त्‍या वेळच्‍या नाटकातील मोठमोठे संवाद आणि नाट्यगीते त्‍यांच्‍या लक्षात आहेत अन् ते तितक्‍याच उत्‍साहाने ते संवाद म्‍हणूनही दाखवतात.

३ अ. श्री. सावकार यांनी वयाच्‍या ९४ व्‍या वर्षीही खणखणीत आवाजात नाटकातील संवाद अभिनयासह म्‍हणून दाखवणे : श्री. सावकार यांनी आम्‍हाला मराठीतील ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातील ‘फाल्‍गुनराव’ आणि ‘नोकर’ ही पात्रे उत्‍साहाने प्रस्‍तुत करून दाखवली. त्‍यांचे नाटकातील संवाद ऐकतांना आणि त्‍यांचा अभिनय पहातांना ते दोन्‍ही पात्रे साकारत असूनही त्‍यांच्‍या बोलण्‍यातील चढ-उतारांतून या दोन्‍ही पात्रांतील संवाद (भेद) आमच्‍या लक्षात येत होता. ‘आम्‍ही जणू प्रत्‍यक्ष नाटक पहात आहोत’, असे आम्‍हाला वाटले. वयाच्‍या ९४ व्‍या वर्षीही त्‍यांचा आवाज खणखणीत असून ‘या वयातही त्‍यांनी त्‍याच ऊर्जेने ती पात्रे रंगवून दाखवली’, हे वैशिष्‍ट्यपूर्ण आहे.

सौ. शुभांगी शेळके

४. चित्रपट क्षेत्रामध्‍ये अधिक मानधन मिळत असतांनाही नाटकांवरील प्रेमाखातर नाट्यक्षेत्रात समाधानाने काम करणे

श्री. प्रसाद सावकार यांनी ‘पेडगावचे शहाणे’, ‘संत गोरा कुंभार’, ‘संत ज्ञानेश्‍वर’, अशा मोजक्‍याच चित्रपटांमध्‍ये भूमिका केल्‍या. चित्रपट क्षेत्रामध्‍ये नाट्यक्षेत्रापेक्षा अधिक मानधन मिळत असतांनाही ते नाट्यक्षेत्रामध्‍येच अविरत काम करत राहिले. यावरून त्‍यांची समाधानी वृत्ती आणि नाटकांवरील प्रेम आमच्‍या लक्षात आले.

५. अहं अल्‍प असणे

५ अ. अनेक मान्‍यवर कलाकारांच्‍या समवेत कामे करण्‍याचा अनुभव असूनही त्‍यांचे बोलणे आणि वागणे यांत तसा आविर्भाव नसणे : ते स्‍वतः एक उत्तम कलाकार आहेत. त्‍यांना नाट्यक्षेत्राचा अनेक दशकांचा अनुभव आहे. त्‍यांनी अनेक मोठ्या कलाकारांच्‍या समवेत कामे केली आहेत, तरी त्‍यांचे बोलणे आणि वागणे यांत कुठेही तसा आविर्भाव नव्‍हता. यातून ‘त्‍यांच्‍यात अहं अल्‍प आहे’, असे आम्‍हाला जाणवले.

५ आ. ‘स्‍वतःला मिळत असलेली महत्त्वाची भूमिका कुठला कलाकार योग्‍य प्रकारे साकारू शकेल ?’, हे अचूक सांगून स्‍वतः दुसरी भूमिका करणे : ‘वर्ष १९६७ मध्‍ये श्री. पुरुषोत्तम दारव्‍हेकर यांच्‍या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात ‘सावकारांनी ‘खानसाहेब’ हे पात्र करावे’, अशी दिग्‍दर्शकांची इच्‍छा होती. तेव्‍हा श्री. सावकार यांनी ती भूमिका ‘त्‍यांच्‍यापेक्षा श्री. वसंतराव देशपांडे अधिक चांगली करू शकतील’, हे दिग्‍दर्शकांना पटवून दिले. हे नाटक आणि त्‍यातील खानसाहेबांची भूमिका अजरामर झाली. एवढी मोठी भूमिका नाकारण्‍यातही सावकारांची त्‍यागी वृत्ती दिसून येते. याविषयी बोलतांना श्री. सावकार म्‍हणाले, ‘‘वसंतराव हे खानसाहेबांच्‍या भूमिकेत ‘अगदी कोंदणात हिरा बसवावा’, तसे चपखल बसले.’’ याच नाटकात त्‍यांनी स्‍वतः ‘सदाशिव’ ही भूमिका साकारली. यातून ‘त्‍यांची निःस्‍वार्थी वृत्ती, सहकलाकारांमधील गुण हेरणे, यांसह सहकलाकारांविषयी असलेला विश्‍वास अन् प्रेमभाव’, हे गुण दिसून आले.

५ इ. अनेक गाण्‍यांना चाली लावूनही ‘संगीतकार’ म्‍हणून नाव न झाल्‍याविषयी काहीही न वाटणे आणि इतरांना सहजतेने त्‍याचे श्रेय घेऊ देणे : श्री. प्रसाद सावकार यांनी काही नाटकांतील गाण्‍यांना चाली दिल्‍या; परंतु संगीतकार म्‍हणून त्‍यांचे नाव न येता अन्‍यांचे नाव आले. यांतील काही नाट्यगीते अजरामरही झाली आणि त्‍यामुळे त्‍या संगीतकारांचे नावही झाले. याविषयी बोलतांना श्री. सावकार म्‍हणाले, ‘‘या गीतांना मी चाल देऊनही ‘संगीतकार’ म्‍हणून माझे नाव दिले नाही’, याचे मला वाईट वाटत नाही. ‘त्‍या चाली लोकांना आवडल्‍या’, यातच मला धन्‍यता वाटते.’’ यातून ‘स्‍वतःच्‍या चाली असूनही इतरांना सहजतेने त्‍याचे श्रेय घेऊ देणार्‍या श्री. सावकार यांचा अहं किती अल्‍प आहे !’, हे दिसून आले.

६. श्री. प्रसाद सावकार यांचे नाटकांतील काही वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभव

६ अ. संत ज्ञानेश्‍वरांवर आधारित नाटकामध्‍ये संत ज्ञानेश्‍वरांची भूमिका साकारण्‍याआधी आळंदीला जाऊन संत ज्ञानेश्‍वरांच्‍या काळातील वातावरण अनुभवणे : श्री. सावकार म्‍हणाले, ‘‘गीता गाती ज्ञानेश्‍वर’ या नाटकात मला संत ज्ञानेश्‍वरांची भूमिका मिळाली. ‘ही भूमिका चांगली व्‍हावी’, यासाठी नाटकाचे लेखक श्री. शिरगोपीकर मला म्‍हणाले, ‘‘सावकार, तुम्‍ही आळंदीला जाऊन या. त्‍याविना तुमच्‍या कामामध्‍ये तो भाव उतरणार नाही.’’ त्‍यांचे बोलणे ऐकून मी माझ्‍या पत्नीसह आळंदीला गेलो. तिथे मी अनेक लहान मुलांना गीतापठण करतांना पाहिले. मला ‘संत ज्ञानेश्‍वरांनी जिवंत समाधी घेतली’ इत्‍यादी सर्व कथा आठवल्‍या. तेथील सात्त्विक वातावरण पाहून माझी भावजागृती झाली. मी तिथे जाऊन हे सगळे प्रत्‍यक्ष पाहिले आणि अनुभवले. त्‍यामुळे मला नाटकात संत ज्ञानेश्‍वरांची भूमिका साकारणे सोपे गेले.

६ आ. ‘संगीत मंदारमाला’ या नाटकात पं. राम मराठे या कसलेल्‍या गायकाच्‍या समवेत जुगलबंदी करायला कुणीही सिद्ध न होणे आणि पं. मराठे यांच्‍या सांगण्‍यावरून श्री. सावकार यांनी जुगलबंदी करणे : संगीत ‘मंदारमाला’ हे नाटक बसवतांना या नाटकातील नायक स्‍वतः पं. राम मराठे असल्‍याने त्‍यांच्‍या समवेत जुगलबंदी करायला कुणी सिद्ध होईना. रामभाऊ (पं. राम मराठे) हे कसलेले गायक होते. ते एकापेक्षा एक सुंदर ताना घेत. त्‍यामुळे अनेकांनी नाटकात त्‍यांच्‍या समवेत जुगलबंदी करायला नकार दिला. सरतेशेवटी रामभाऊ मला म्‍हणाले, ‘‘अहो सावकार, तुम्‍ही गायन शिकला आहात ना ? तुम्‍हीच माझ्‍या समवेत जुगलबंदी का करत नाही ?’’ मी त्‍यांना म्‍हणालो, ‘‘अहो, सिंहाची आणि सशाची कधी जुगलबंदी होऊन शकेल का ?’’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘अहो, तुम्‍ही काळजी करू नका. आपण ती जुगलबंदी बसवूया.’’ अशा प्रकारे त्‍यांनी मला आश्‍वस्‍त केल्‍यामुळेे मी त्‍यांच्‍या समवेत जुगलबंदी करायला होकार दिला.

६ इ. पं. दीनानाथ मंगेशकर यांच्‍या ‘लताच्‍या गळ्‍यात गंधार आहे’, या वाक्‍याचा श्री. सावकार यांनी सांगितलेला अर्थ ! : पं. दीनानाथ मंगेशकर नेहमी म्‍हणायचे, ‘‘आमच्‍या लताच्‍या गळ्‍यात ‘गंधार’ आहे !’’ अनेकांना प्रश्‍न पडतो, ‘गळ्‍यात गंधार आहे’, म्‍हणजे काय ?’ याचे उत्तर आहे, ‘आपण म्‍हणतो, ‘दुधात साखर’, त्‍याप्रमाणे ‘गळ्‍यात गंधार’, ही एक म्‍हण आहे. तंबोर्‍याला ४ तारा असतात. त्‍यांतील ३ तारा या षड्‍जाच्‍या (सा) आणि एक तार पंचम (प) किंवा मध्‍यमची (म) असतेे. या सर्व तारा सुरात लागल्‍यावर त्‍यातून विना आघात जो स्‍वर ऐकू येतो, तो म्‍हणजे सप्‍तसुरांपैकी ‘ग’, म्‍हणजेच ‘गंधार’ होय ! त्‍यामुळे या ‘गंधार’ला संगीतात विशेष महत्त्व आहे.

६ ई. श्री. सावकार यांनी ‘कट्यार काळजात घुसली’, या संगीत नाटकातील संवादाद्वारे ‘विद्या’ आणि ‘कला’ यांतील भेद सांगणे : श्री. पुरुषोत्तम दारव्‍हेकर यांनी ‘कट्यार काळजात घुसली’, हे संगीत नाटक लिहिले. त्‍यात त्‍यांनी ‘विद्या आणि कला’ यांतील भेद काही संवादांतून मांडला आहे. ते संवाद पुढीलप्रमाणे आहेत, ‘‘विद्या वेगळी आणि कला वेगळी ! विद्या बाहेरून आपल्‍यात शिरते, तर कला आतून बाहेर पडते. विद्येसाठी केवळ मस्‍तक पुरे; पण कलेसाठी मस्‍तक आणि हृदय दोन्‍ही लागते. विद्या जगाचे कोडे सोडवते; पण कला जगाचे कोडे घडवते. विद्या सुपारीसारखी देता येते; पण कला तपकिरीसारखी उचलावी लागते. विद्या ही तालासारखी असते. ती शिकता आणि शिकवता येते; पण कला ही लयीसारखी असते. ती अंगात असावी लागते. जन्‍माला येतांना देवाकडून आणावी लागते.’’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, संगीत विशारद, संगीत समन्‍वयक) आणि सौ. शुभांगी शेळके, एम्.ए. नाट्यशास्‍त्र, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.  (२१.१२.२०२२)

श्री. प्रसाद सावकार यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या कार्याविषयी काढलेले गौरवोद़्‍गार !

या भेटीच्‍या वेळी श्री. प्रसाद सावकार यांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय करत असलेले संगीत आणि नृत्‍य यांविषयीचे संशोधन ‘पी.पी.टी. (टीप)’च्‍या माध्‍यमातून दाखवण्‍यात आले. हे संशोधन पाहून ते म्‍हणाले, ‘‘आजच्‍या काळाला अनुसरून हे सगळे पुढच्‍या पिढीला कळणे पुष्‍कळच महत्त्वाचे आहे. हे कार्य बघून मी अगदी भारावून गेलो. मी आज पुष्‍कळ काहीतरी वेगळे ऐकले आणि पाहिले. तुम्‍ही सर्व जे करत आहात, ती अतिशय विशेष गोष्‍ट आहे. यासाठी अंगी संशोधक वृत्ती लागते. हे संशोधन कार्य सर्व लोकांपर्यंत पोचले पाहिजे. तुमचे विविधांगी संशोधनकार्य बघून ‘रंगभूमीवर असतांना अभिनयाविषयी संशोधन कसे करू शकतो ?’, हे माझ्‍या लक्षात आले.’’ ते पुढे म्‍हणाले, ‘‘हे सर्व पाहून मला महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाला भेट देण्‍याची इच्‍छा आहे.’’

टीप – पी.पी.टी. : ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (पी.पी.टी.)’ ही एक संगणकीय प्रणाली (सॉफ्‍टवेअर) असून यावर संबंधित विषयाची विविध वैशिष्‍ट्ये दाखवता येतात.’