मंदिरांचे पावित्र्य आणि परंपरा जोपासाव्यात !-  पालकमंत्री उदय सामंत

राजापूर येथे श्री देव धूतपापेश्वर मंदिर संवर्धन आणि सुशोभिकरण कामाचा शुभारंभ

धूतपापेश्वर मंदिराचे जतन संवर्धन आणि परिसर विकासाचा बृहत् आराखडा तयार करण्यात आला आहे.

राजापूर – मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आणि अस्मिता आहे. या मंदिरांचे पावित्र्य आणि परंपरा जोपासल्या पाहिजेत, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. येथील आराध्य दैवत असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिराच्या संवर्धन आणि सुशोभिकरण कामाचा शुभारंभ २३ एप्रिल या दिवशी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी धोपेश्वर सरपंच सौ. समिक्षा गुरव, गावकर प्रकाश बांदीवडेकर, उपविभागीय अधिकारी वैशाली माने, तहसीलदार सौ. शीतल जाधव, श्री देव धूतपापेश्वर मंदिर संस्थानचे प्रशासक अजितकुमार थोरात, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की,

१. श्री देव धूतपापेश्वराच्या कृपाशीर्वादानेच मी पालकमंत्री झालो. त्यामुळे भविष्यातही राजापूरच्या विकासासाठी निधी न्यून पडू देणार नाही.

२. राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताच या कामाला निधी संमत करून दिलेला आहे. त्यामुळे हे काम पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळे अन्य कुणीही या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.

३. पुरातन असलेल्या या मंदिराच्या सुशोभिकरण आणि संवर्धन यांसाठी राज्यशासनाच्या तीर्थक्षेत्र पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. धूतपापेश्वर मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी ११ कोटी रुपयांचा निधी संमत असून मंदिराचे जतन संवर्धन आणि परिसर विकासाचा बृहत् आराखडा तयार करण्यात आला आहे.

४. मंदिराचे काम योग्य प्रकारे होणे आवश्यक असून यासाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करणार आहे.