(म्हणे) ‘धार्मिक भावना दुखावल्यामुळेच हिंदूंविषयी अपमानास्पद टिपणी केली !’ – दक्षिण गोव्यातील जुळ्या मुसलमान बहिणीं

‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या गोव्यातील जुळ्या मुसलमान बहिणींचा जामिनासाठीच्या अर्जात दावा

पणजी, २२ एप्रिल (वार्ता.) – दक्षिण गोव्यातील ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंटधारक राबिया आणि शाझिया ककर (वय २१ वर्षे) या जुळ्या बहिणींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ही पोस्ट सर्वत्र प्रसारित होऊ लागल्यानंतर आणि याविषयीची माहिती एका ट्विटर खातेधारकाने दिल्यानंतर गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ‘सारा एक्सईसी’ आणि ‘शाझिया ७७७’ या ‘इन्स्टाग्राम’ खातेधारकांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे.

या जुळ्या बहिणींनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. धार्मिक भावना दुखावल्यामुळेच हिंदूंविषयी अपमानास्पद टिप्पणी केल्याचा दावा या जुळ्या बहिणींनी अटकपूर्व जामीन अर्जात केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २४ एप्रिल या दिवशी होणार आहे.

(सौजन्य : Prudent Media Goa)  

दोन्ही बहिणी अटकपूर्व जामीन अर्जात म्हणतात, ‘‘एका व्यक्तीने आम्हाला इन्स्टाग्रामच्या एका गटात समाविष्ट केले. या गटामध्ये उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद याच्या हत्येनंतर एक चलचित्र ‘पोस्ट’ करून आमचा धर्म आणि प्रेषित यांचा अवमान करण्यात आला. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या. यानंतर इन्स्टाग्रामवर धार्मिक संघर्ष चालू झाला.

आमच्यावर बलात्कार करण्याची आणि आम्हाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याच कालावधीत संबंधित व्यक्तीने आक्षेपार्ह चलचित्र सामाजिक माध्यमातून काढून खरी माहिती लपवून ठेवली. संबंधित व्यक्तीने आमच्या विरोधात षड्यंत्र रचले. यामुळे उत्तेजित होऊन आम्ही हिंदूंविषयीचे लिखाण ‘पोस्ट’ केले. गुन्हे अन्वेषण विभागाने वरिष्ठ आणि इतर यांच्या दबावाखाली येऊन घटनेविषयी सखोल अन्वेषण न करताच आमच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला.’’ (जामीन अर्जातील मुसलमान बहिणींचे हे म्हणणे कितपत खरे आहे, ते गुन्हे अन्वेषण विभागाने पडताळावे ! हे हिंदूंच्या विरोधात रचलेले षड्यंत्रही असू शकते ! – संपादक)


सविस्तर वृत्त वाचा –

गोवा : दोन शालेय विद्यार्थिनींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या
https://sanatanprabhat.org/marathi/675109.html