येमेनची राजधानी साना येथे आर्थिक साहाय्य वाटपाच्या वेळी चेंगराचेंगरी : ८५ जणांचा मृत्यू, तर १०० जण घायाळ

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्याने हवेत केलेल्या गोळीबारामुळे घडली घटना !

घटनास्थळ

साना (येमेन) – आखाती देशांपैकी एक असणार्‍या येमेनची राजधानी साना येथे आर्थिक साहाय्य वाटपाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ८५ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण घायाळ झाले. येथे जमलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैनिकांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारामुळे विजेच्या तारांचा स्फोट झाला. त्याच्या आवाजामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होऊन ते सैरावैरा धावू लागले आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली.

गृह मंत्रालयाने सांगितले की, स्थानिक प्रशासनाच्या साहाय्याविना हा कार्यक्रम तेथील व्यापार्‍यांनी आयोजित केला होता. यामध्ये गरीब नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी दोघांना कह्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.