एकाही हिंदु व्‍यापार्‍यावर आक्रमण झाले, तर जशास तसे उत्तर देऊ ! – भाजपचे आमदार नितेश राणे यांची चेतावणी

नगर येथील हिंदु व्‍यापार्‍यांवर झालेल्‍या आक्रमणाचे प्रकरण

नागरिकांशी चर्चा करतांना नितेश राणे

नगर – येथे जिहाद्यांनी केलेले अतिक्रमण आणि त्‍यांची दादागिरी पुष्‍कळ वाढलेली आहे. त्‍यामुळे येथील हिंदु व्‍यापार्‍यांवर मुख्‍य बाजारपेठ सोडून जाण्‍याची वेळ आलेली आहे; पण आता यापुढे या जिहाद्यांना त्‍यांच्‍याच भाषेत उत्तर दिले जाईल, तसेच या ठिकाणचे अतिक्रमण हे कायमस्‍वरूपी निघाले पाहिजे, यासाठी आम्‍ही जातीने लक्ष घालून उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी या विषयावर चर्चा करणार आहोत. येथून पुढे एकाही हिंदु व्‍यापार्‍यावर अन्‍याय झाला, तर तो आम्‍ही खपवून घेणार नाही, अशी चेतावणी आमदार नितेश राणे यांनी दिली. ते नगर येथील हिंदु व्‍यापार्‍यांवर झालेल्‍या आक्रमणाचा निषेध करण्‍यासाठी आणि व्‍यापार्‍यांची भेट घेण्‍यासाठी १८ एप्रिल या दिवशी नगर येथे आले असता बोलत होते. या वेळी त्‍यांनी हिंदु व्‍यापार्‍यांना आश्‍वासन दिले आणि त्‍यानंतर जिल्‍हाधिकार्‍यांना या संदर्भात निवेदनही देण्‍यात आले. या वेळी १ सहस्रहून अधिक हिंदु बांधव आणि व्‍यापारी वर्ग उपस्‍थित होता. ‘जय श्रीराम’च्‍या घोषणेने सर्व कापडबाजार परिसर दुमदुमला होता.

नितेश राणे यांच्‍या भाषणाच्‍या वेळी उपस्‍थित व्‍यापारी आणि हिंदू

नितेश राणे पुढे म्‍हणाले की, या संदर्भात आम्‍ही पोलीस प्रशासनालाही गांभीर्याने लक्ष देण्‍याची चेतावणी देत आहोत. हा पोलिसांचाही या घटनेविषयी निष्‍काळजीपणा आहे. तरी स्‍थानिक पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन या सर्वांनी मिळून या व्‍यापार्‍यांच्‍या अडचणी, स्‍थानिक अतिक्रमण हे त्‍वरित हटवून त्‍यांच्‍यावर कायमची कारवाई होईल, या संदर्भातील विशेष ठोस पावले उचलून उपाययोजना कराव्‍यात. या बाजारपेठेमध्‍ये हिंदूंना होणारा त्रास, हिंदूंच्‍या बहिणींना होणारा त्रास, छेडछाड काढण्‍याचे प्रकार असे कुठलेही प्रकार आता खपवून घेतले जाणार नाही.