गौरी लंकेश प्रकरणात हिंदूंच्या बाजूने लढणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार करणार्‍यांचा शोध घ्या !

हिंदु जनजागृती समितीकडून कर्नाटक राज्याच्या पोलीस महासंचालकांना निवेदन सादर

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील साम्यवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदूंच्या बाजूने लढणारे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर १२ एप्रिलच्या रात्री अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. या आक्रमणामागे बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) किंवा नक्षलवादी आहेत का ?, याचा शोध घेण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्याच्या पोलीस महासंचालकांना केली. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) आलोक कुमार यांनी या वेळी निवेदन देण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा, कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी, अधिवक्ता जी.एम्. नटराज, अधिवक्ता प्रसन्ना डी.पी., अधिवक्ता दिव्या बाळेहित्तलु, अधिवक्ता नवीन बी.आर्., अधिवक्ता शिवु आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी श्री. मोहन गौडा यांनी, ‘या आक्रमणामागे कोण आहे ?’, ‘या आक्रमणाचा कुणाला लाभ होणार आहे ?’, या दृष्टीने कर्नाटक पोलिसांनी य प्रकरणाचे अन्वेषण करून आक्रमणकर्ते आणि मुख्य सूत्रधार यांचा शोध घ्यावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे.