यावर्षी आंब्याचे उत्पादन केवळ १२ ते १५ टक्के
रत्नागिरी – आंबा बागायतदारांच्या समस्यांविषयी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या वेळी पालकमंत्र्यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासन आंबा बागायतदारांच्या पाठीशी असून आंबा बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे आश्वासन पालकमंत्री उदय सांमत यांनी दिले.
या वेळी जिल्हाधिकारी एम् देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अन्य प्रशासकीय अधिकारी आणि जिल्ह्यातील आंबा बागायतदार उपस्थित होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३मध्ये केवळ १२ ते १५ टक्के आंबा उत्पादन; राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी : उदय सामंत https://t.co/RcUF5ucR3l
— Kokan Media (@KokanMedia) April 12, 2023
पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले,
१. गेल्या वर्षापेक्षा यावर्षीचे आंबा उत्पादन केवळ १२ ते १५ टक्के असल्याचे कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी सांगितले आहे. तसा अहवाल त्यांनी तात्काळ शासनाकडे सादर करावा.
२. आंबा बागायतदारांचे हवामानातील पालटामुळे जी हानी झाले. त्याविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंबा बागायतदारांना साहाय्य करण्याविषयी विनंती करणार आहोत.
३. भविष्यात आंबा बागायतदारांसाठी कायमची तजवीज व्हावी, यासाठी काजू बोर्डाप्रमाणे आंबा बोर्डामध्येही निर्णय घेण्यात येतील.
४. आंब्यावरील औषध आणि आंब्यावर पडणार्या रोगांचे संशोधन करण्यासाठी बागायतदारांच्या मागणीनुसार समिती स्थापन करण्यात येणार असून दापोली कोकण कृषी विद्यापिठातील २ शास्त्रज्ञ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आंबा बागायतदारांचे २ प्रतिनिधी, कृषी मंत्रालयातील प्रतिनिधी आणि औषध निर्माते यांचा १ प्रतिनिधी या समितीमध्ये असणार आहे.
५. आंबा बागातदारांसाठी ४ ‘कोल्ड स्टोरेज’ वाहने संमत करण्यात आली असून प्रारंभी २ वाहने पुरवण्यात येणार आहेत.