तुलसी पीठाधीश्वर जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य यांचे आवाहन !
आगरा (उत्तरप्रदेश) – लव्ह जिहादद्वारे आमच्या हिंदु मुलींना अन्य धर्मीय जाळ्यात अडकवत आहेत. भगिनींनो, जो तुमच्याकडे वाईट दृष्टीने पाहील, त्याचे डोळे काढा. नंतर खटला होईल, तो मी पाहीन, असे आवाहन ७३ वर्षीय तुलसी पीठाधीश्वर जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य यांनी येथे एका प्रवचनात केले. या प्रवचनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. स्वामी रामभद्राचार्य हे दृष्टीहीन आहेत.
सौजन्य एबीपी गंगा
स्वामी रामभद्राचार्य यांनी मांडलेली सूत्रे
१. हिंदु मुलींनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी हातामध्ये कडे घालावे, तसेच कट्यार चालवण्याचाही सराव करावा. तरच तुम्ही राणी लक्ष्मीबाई बनाल.
२. आम्ही जातीवाद पसरवत नाही, तर खुर्चीसाठी हपापलेल्या नेत्यांनी जातीवाद पसरवला आहे. नेत्यांना आव्हान देतो की, जर तुम्ही आईचे दूध प्यायले असाल, तर जातीच्या आधारे देण्यात आलेले आरक्षण रहित करा.
३. असे म्हटले जाते की, ब्राह्मणांनी जातीवादाला जन्म दिला; मात्र आम्ही जातीवादाला जन्म दिलेला नाही.
४. अप्रमाणिक लोकांनी केवळ मतांच्या राजकारणासाठी देशात फूट पाडली आहे. जर आम्ही जातीवाद पसवला असता, तर माता शबरीची उष्टी बोरे भगवान श्रीरामाने का खाल्ली असती ? जेव्हा रामचरितमानस राष्ट्रीय ग्रंथ बनेल, तेव्हाच समाजामध्ये सुधारणा होईल.
जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य यांचा परिचय
उत्तरप्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात जन्मलेले जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य यांचे मूळ नाव गिरधर मिश्रा आहे. स्वामी रामानंद संप्रदायाच्या ४ जगदगुरु रामानंदाचार्यांपैकी ते एक आहेत. वर्ष १९८८ पासून ते या पदावर आहेत. २ मासांचे असतांना त्यांची दृष्टी गेली. तरीही त्यांना २२ भाषा अवगत आहेत आणि त्यांनी एकूण ८० ग्रंथांची निर्मिती केली आहे. बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे ते गुरु आहेत. तसेच श्रीराममंदिराच्या संदर्भातील खटल्यात त्यांनी दिलेल्या साक्षीमुळे हिंदूंच्या बाजूने निकाल लागण्यास साहाय्य झाले होते.