‘जानेवारी २०२३ मध्ये मला सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातून देवद, पनवेल येथील आश्रमामध्ये सेवेसाठी येण्याची संधी मिळाली. तेव्हा वैद्यकीय सेवेअंतर्गत मला वैद्या सुश्री (कु.) माया पाटील यांचा सहवास लाभला. येथे आल्यापासून या २ मासांच्या कालावधीमध्ये मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले.
१. जवळीक साधणे आणि आधार देणे
आश्रमामध्ये अनेक वयस्कर साधक आहेत. त्यांची मायाताईंशी जवळीक आहे आणि त्यांना ताईंचा आधारही वाटतो. मलाही असेच वाटते. खरे तर या पूर्वी ताईंचा आणि माझा एवढा संपर्क नव्हता; पण तरीही ताईंतील ‘प्रीती आणि इतरांना समजून घेणे’ या गुणांमुळे मला त्यांच्याशी अल्पावधीत मनमोकळेपणाने बोलता येऊ लागले.
२. मायाताईंमध्ये रुग्णांप्रती संवेदनशीलता असून रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळून बरे वाटावे, अशी त्यांची तळमळ असते.
३. तत्त्वनिष्ठ आणि वस्तूनिष्ठ
मायाताई कुणालाही भावनेच्या स्तरावर हाताळत नाहीत. त्या नेहमी तत्त्वनिष्ठ असतात. काही चुकत असल्यास त्या लगेच त्याची जाणीव करून देतात. त्यांचे बोलणे सूत्रबद्ध आणि वस्तूनिष्ठ असून त्यामध्ये एका प्रकारची गोडी असते. ‘त्या एका लयीत बोलतात, तेव्हा त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे मला वाटते.
४. गुरुदेवांच्या प्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती) दृढ श्रद्धा असल्यामुळे मायाताई एकाच वेळी विविध प्रकारच्या सेवा आत्मविश्वासाने, सहजतेने आणि ताण न घेता करू शकतात, असे मला जाणवले.
५. मायाताई अखंड सेवारत राहून गुरुदेवांचे आज्ञापालन करण्याचा सतत प्रयत्न करतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडे अनेक समष्टी सेवांचे दायित्व असूनही तेवढ्याच गांभीर्याने त्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतात. त्या प्रत्येक कृती अत्यंत व्यवस्थितपणे साधना म्हणून करतात.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने मला मायाताईंसारखी ‘बहुगुणी आध्यात्मिक आई’ लाभली; म्हणून त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री गुरुचरण सेविका,
वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर (वय २६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.३.२०२३)