वाडा, देवगड (सिंधुदुर्ग) येथील वीजवितरणचे अधिकारी अमित पाटील यांना लाच घेतांना अटक

वीजजोडणीसाठी ३० सहस्र रुपयांची लाच घेतांना कारवाई

वीजजोडणीसाठी ३० सहस्र रुपयांची लाच घेतांना कारवाई

देवगड – तालुक्यातील वाडा येथे आंबा बागेत वीजजोडणी देण्यासाठी ३० सहस्र रुपयांची लाच घेतांना वीजवितरण आस्थापनाचे साहाय्यक अभियंता अमित आप्पासाहेब पाटील यांना सिंधुदुर्ग जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ६ एप्रिल या दिवशी कह्यात घेतले. ही कारवाई तालुक्यातील वीजवितरण आस्थापनाच्या वाडा उपकेंद्रात करण्यात आली.

वाडा येथील एका बागायतदाराने स्वत:च्या आणि मित्राच्या आंबा बागेत वीजजोडणी मिळण्यासाठी अर्ज केला होता. या वेळी पाटील यांनी जोडणी देण्यासाठी बागायतदाराला २० सहस्र रुपये आणि त्याच्या मित्राला १० सहस्र रुपये, अशी एकूण ३० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. याविषयी संबंधित बागायतदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ६ एप्रिल या दिवशी वाडा येथे सापळा रचून  संशयित पाटील यांना कह्यात घेण्यात आले. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार पाटील यांना लाच घेतांना प्रत्यक्ष पकडण्याची ही दुसरी वेळ असून यापूर्वी गगनबावडा येथे कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली होती. (भ्रष्टाचार्‍यांवर पहिल्याच वेळी कडक कारवाई न केल्याने त्यांना पुन:पुन्हा भ्रष्टाचार करण्याचे धाडस होते, हे यातून सिद्ध होते. त्यामुळे अशांचे स्थानांतर किंवा निलंबन नाही, त्यांना नोकरीतून बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक)