एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमाला ! |
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !
राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.
प्रतिनिधी : श्री. लहू खामणकर, वणी
वणी, २९ मार्च (वार्ता.) – पावसाळ्यात छतामधून ठिबकणारे पाणी, बुरशी आणि शेवाळे यांमुळे विद्रूप भिंती, मोडकी कपाटे अशा अमरावती जिल्ह्यातील वणी बसस्थानकातील विश्रामगृहात एस्.टी. चालक-वाहक यांना रहावे लागत आहे. मागील काही वर्षांपासून वणी बसस्थानकातील विश्रामगृहाची स्थिती विदारक अशी आहे.
१. गेल्या काही वर्षांपासून या दुरवस्था असलेल्या विश्रामगृहात चालक-वाहक यांना थांबावे लागते. गळक्या छतामुळे पावसाळ्यात चालक-वाहक यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
२. बसस्थानकाच्या मुख्य कमानीवरील वणी बसस्थानकाचेच नाव पुसले गेले होते, त्याला काही दिवसापूर्वी रंग देण्यात आला आहे.
३. बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम अनेक ठिकाणी ढासळले आहे. बसस्थानकाच्या भिंती सातत्याने लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकांमुळे विद्रूप झाल्या आहेत.
४. बसस्थानकावर कधीतरी लावण्यात आलेल्या कागदी पताकांच्या काहीच पताका शिल्लक आहेत; मात्र त्या तशाच ठेवण्यात आल्या आहेत.
५. बसस्थानकाच्या एकूण १० एकरच्या परिसरात अनेक ठिकाणी कचरा पसरलेला असतो.
कर्मचार्यांनी मांडल्या व्यथा !
येथील काही चालकांशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सांगितले की, खेडेगावात बस मुक्कामी असतांना विश्रांतीसाठी कोणतीच सुविधा उपलब्ध होत नाही. रात्री बसमध्येच झोपावे लागते.
१५ दिवस उलटूनही वेतन मिळत नाही, किराणा साहित्य उधारीवर आणावे लागते. आम्हाला रोजंदारीवर असलेल्या कामगारांप्रमाणे वागणूक मिळते. आमचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. अशा स्थितीत बस चालवतांना अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवा !आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सअप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा. |