मुंबई, २८ मार्च (वार्ता.) – शासकीय कार्यालयात समस्या घेऊन, तसेच कामानिमित्त येणार्या नागरिकांसाठी अधिकार्यांनी निश्चित वेळ राखून ठेवावा, असा महत्त्वपूर्ण आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. अभ्यागतांसाठी कोणती वेळ ठरवण्यात आली आहे, याची पाटीही कार्यालयाबाहेर लावावी, अशी सूचनाही आदेशात आहे. मंत्रालयापासून ते सर्व शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषद ते ग्रामपंचायतीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हा आदेश लागू होणार आहे.
आठवडा, पंधरवडा किंवा मासातून ठराविक वेळ निश्चित करावा. शक्यतो दुपारी २.३० ते ३.३० ही समान वेळ असावी. या वेळेत शक्यतो दौर्यांचे नियोजन करण्यात येऊ नये, असे आदेशत म्हटले आहे. पूर्वअनुमती न घेता कार्यालयात कामासाठी येणार्या नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी नोंदवही ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे. यापूर्वी वर्ष २०१० मध्ये याविषयी शासनाने परिपत्रक काढले आहे. त्यानंतर वर्ष २०१३ आणि २०१६ मध्येही परिपत्रक काढण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक शासकीय कार्यालयांमध्ये यानुसार अद्यापही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे राज्यशासनाने याविषयीचा शासन आदेश निर्गमित केला आहे.