तुळापूर – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या स्मृतिदिनानिमित्त अनेक शिव-शंभू भक्तांनी पुणे जिल्ह्यातून तसेच राज्याच्या कानाकोपर्यातून वढू-तुळापूर येथील समाधी स्थळी जमून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संभाजी राजे यांना अभिवादन केले. पिंपरी-चिंचवड येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह प्रमुख अधिकारी, ग्रामस्थ शिवप्रेमी यांनी संभाजी राजांच्या समाधीचे दर्शन घेतले. वढू ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांच्या हस्ते आमदार महेश लांडगे, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचा सन्मान करण्यात आला. मूकपदयात्रा, धर्मसभा यांसह रक्तदान शिबिराचेही या वेळी आयोजन केले होते. पहाटे वढू तुळापूर येथे छत्रपतींच्या समाधीस्थळी ग्रामस्थांनी अभिषेक केला. पुणे जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालक यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे कीर्तन पार पडले. सर्व शंभू भक्तांनी समाधीवर पुष्पवृष्टी केली.