पुणे – महापालिकेने पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पी.एम्.पी.) दिलेल्या जकात नाक्यांच्या ४ जागांवर बस आगाराची कामे पूर्ण झाली असून त्यांचा वापर चालू झाला आहे; मात्र अजूनही बर्याच ठिकाणी ‘पी.एम्.पी.’ला त्यांच्या बस रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत ‘पी.एम्.पी.’ला बस आगारासाठी आणखी मोठ्या जागा मिळण्याची आवश्यकता आहे. महापालिकेने त्यांच्याकडील या नाक्यांच्या जागा काही वर्षांपूर्वी ‘पी.एम्.पी.’ला नाममात्र दराने वापरासाठी दिल्या. त्यामुळे रस्त्यांवर थांबणार्या ‘पी.एम्.पी.’ बसला काही प्रमाणात आगाराचा आधार मिळण्याची चिन्हे दिसू लागली.
‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट’च्या (सी.आय.आर्.टी.) नियमानुसार १ लाख प्रवाशांसाठी किमान ५० बसची आवश्यकता असते. पुण्याची लोकसंख्या १९० लाखांपेक्षा अधिक आहे. त्यानुसार किमान साडेतीन सहस्र बसची पुण्याला आवश्यकता असून या बससाठी किमान ३५ आगारांची आवश्यकता आहे. सध्या ‘पी.एम्.पी.’कडे २ सहस्र १०० बस आहेत. त्यासाठीही प्रत्यक्षात २१ आगारांची आवश्यकता आहे. जकात नाक्यांप्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पी.एम्.आर्.डी.ए. यांच्याकडून पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध झाल्यास आगारांचा प्रश्न गतीने सुटण्यास साहाय्य होऊ शकते.