(म्‍हणे) ‘माहीमच्‍या समुद्रातील मजार हटवण्‍याची इतकी घाई का केली ?’ – अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी

मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – माहीमच्‍या समुद्रातील मजार हटवण्‍याची लवकर कारवाई करण्‍यापेक्षा एकदा त्‍यांना नोटीस पाठवायला हवी होती. त्‍यांच्‍याकडून कागदपत्रे मागवायला पाहिजे होती. ती पडताळायला हवी होती. ते बांधकाम अनधिकृत आहे कि अधिकृत आहे, हे पडताळाला पाहिजे होते. एका मिनिटात तिथे जाऊन कारवाई करणे म्‍हणजे हे ध्रुवीकरण आहे. हे सूत्र दुसर्‍या कुणाकडे जाऊ नये, यासाठी ही कारवाई इतक्‍या तातडीने करण्‍यात आली आहे, असे विधान करत येथील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी २३ मार्च या दिवशी मुक्‍ताफळे उधळली आहेत.

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी २२ मार्च या दिवशीच्‍या गुढीपाडवा मेळाव्‍याच्‍या वेळी माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्‍याची माहिती देणारा एक व्‍हिडिओ दाखवला होता. राज ठाकरे यांनी, ‘एका मासाच्‍या आत हे मजारीचे बांधकाम हटवण्‍यात आले नाही, तर आम्‍ही तिथे मोठे गणपति मंदिर बांधू’, अशी चेतावणीही त्‍यांनी दिली होती. त्‍यानंतर काही घंट्यांतच प्रशासनाने धडक कारवाई करत बांधकामासह ती मजार जेसीबीच्‍या साहाय्‍याने भुईसपाट केल्‍याने अबू आझमी यांनी ही संतप्‍त प्रतिक्रिया दिली आहे.