१. गुढीपाडव्याच्या दिवशी भावजागृतीचा प्रयोग घेण्याची संधी मिळणे
‘वर्ष २०२१ च्या गुढीपाडव्याच्या दिवशी मला एका साधिकेने भावजागृतीचा प्रयोग घेण्याची संधी दिली. त्या कालावधीत माझा मोठा भाऊ रुग्णाईत होता. आम्ही सर्व कुटुंबीय ‘त्याला बरे वाटण्यासाठी गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) कसे साहाय्य करत आहेत ?’, हे क्षणोक्षणी अनुभवत होतो.
२. श्रीरामरूपी गुरुमाऊली ‘हिंदु राष्ट्रा’च्या सिंहासनावर आरूढ झालेली असून हिंदु राष्ट्र स्थुलातून रामनाथी आश्रमात असणे आणि ते सूक्ष्मातून हृदयात असल्याचे जाणवणे
प्रभु श्रीरामाने गुढीपाडव्याच्या दिवशी रामराज्याची स्थापना केली. ‘ते रामराज्य आम्ही सर्व साधक या कलियुगामध्ये रामनाथी आश्रमात अनुभवत आहोत’, असे मला वाटले. याच विषयावर भावजागृतीचा प्रयोग घेतांना मला असे जाणवले, ‘साक्षात् श्रीरामरूपी गुरुमाऊली हिंदु राष्ट्राच्या सिंहासनावर आरूढ झालेली आहे आणि स्थुलातून रामनाथी आश्रमात हिंदु राष्ट्र असले, तरी ते सूक्ष्मातून आमच्या हृदयात आहे. आम्ही सगळे हृदयातील सिंहासनावर गुरुमाऊलीला पहात आहोत. गुरुमाऊलीचे सुंदर विलोभनीय राजसरूप याच डोळ्यांनी पहातांना साधकांचा भाव जागृत होत आहे. हिंदु राष्ट्राच्या राजाला सिंहासनाधिष्ठित झालेले पाहून सगळ्यांना अत्यानंद झाला आहे. सगळे आनंदाने नाचत आणि गात भावविभोर झाले आहेत.’
३. त्रेतायुगात अयोध्यावासियांनी रामराज्य पाहिलेले असणे, तर कलियुगात साधकांनी तेच रामराज्य गुरुमाऊलीच्या कृपेने अनुभवणे
वरील भावप्रयोगाच्या वेळी ‘हिंदु राष्ट्र माझ्या पेशीपेशीत, कणाकणात आणि सृष्टीच्या प्रत्येक ठिकाणी आहे’, असे मला वाटले. ते कायम टिकवून ठेवण्यासाठी मला आदर्श व्हावे लागेल. मला स्वभावदोष आणि अहं यांवर मात करावी लागेल. मी गुरुमाऊलीला तशी प्रार्थना केल्यावर गुरुमाऊलीने मला भरभरून आशीर्वाद दिला. त्रेतायुगामध्ये अयोध्यावासियांनी रामराज्य पाहिले; पण आम्ही साधक कलियुगामध्ये गुरुमाऊलीच्या कृपेने तेच रामराज्य पहात आणि अनुभवत आहोत, तसेच चैतन्य घेत आहोत.
४. चला चला ग सयांनो, गाऊ माऊलींची ओवी ।
वरील भाव अनुभवतांना गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता वाटली आणि ती ओवीमधून व्यक्त झाली.
माऊलींचे ग हृदय ।
ब्रह्मांडासम विशाल ॥ १ ॥
सांग सांग माझ्या सये ।
काय दिसते गं त्यात ॥ २ ॥
‘हिंदु राष्ट्र’ दिसे त्यात ।
साधक संत गं रहाती त्यात ॥ ३ ॥
चला चला ग सयांनो, गाऊ माऊलींची ओवी ।
आम्ही माऊलीच्या लेकी, वर्णू गुरूंची थोरवी ॥ ४ ॥
– सौ. शुभांगी शेळके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०२१)
|