जगातील २६ टक्के लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही !

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात माहिती उपलब्ध  

कॅलिफोर्निया – संयुक्त राष्ट्रांनी सादर केलेल्या ‘युनायटेड नेशन्स वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट २०२३’नुसार जगातील २६ टक्के लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही, तर ४६ टक्के जनतेकडे स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. या अहवालामध्ये वर्ष २०३० पर्यंत लोकांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी पावले उचलण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. या अहवालात नमूद केल्यानुसार मागील ४० वर्षांपासून जागतिक स्तरावर पाण्याचा वापर प्रतिवर्षी १ टक्क्यांनी वाढत आहे. लोकसंख्या वाढ, सामाजिक-आर्थिक विकास या कारणांमुळे वर्ष २०५० पर्यंत जागतिक स्तरावर पाण्याचा वापर प्रत्येक वर्षी १ टक्क्याने वाढणार आहे. या अहवालानुसार तापमान वाढीमुळे पावसाळ्यामुळे पाणी उपलब्ध होण्याचे प्रमाण पुढील काही काळात घटणार आहे. मध्य आफ्रिका, पूर्व आशिया, दक्षिण अमेरिका आदी ठिकाणी पाणीटंचाई आहे. या ठिकाणी ही टंचाई अधिक प्रमाणात भेडसावण्याची शक्यता आहे.