श्री. किशोर जगताप (सोलापूर प्रतिनिधी)
सोलापूर, १८ मार्च (वार्ता.) – येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, चिखल आणि बसस्थानावर उघड्यावर करण्यात येत असलेले मूत्रविसर्जन, यांमुळे बसस्थानकावर अत्यंत अस्वच्छता असून दुर्गंधी पसरली आहे.
बसस्थानकाच्या आवारात ३ ठिकाणी उघड्यावरच मूत्रविसर्जन केले जाते. संपूर्ण बसस्थानकात त्याची दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानकाच्या आवारात जागोजागी गुटखा, पानमसाला खाऊन थुंकल्याचे डाग आहेत. बसस्थानकावर इतरत्र खाऊची प्लास्टिक वेस्टने, प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असतात. बसस्थानकावरील उपाहारगृह बंद आहे. उपाहारगृहाच्या आतमध्ये अत्यंत अस्वच्छता आहे. बसस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी असलेली बाकडे मोडली असून अनेक मासांपासून ती त्याच स्थितीत आहेत. ही बाकडी दुरुस्त करण्यात आलेली नाहीत. बसस्थानकातून गाड्या बाहेर पडण्याचा मार्गावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचते. बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकामही काही ठिकाणी मोडकळीस आले आहे. त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
चालक-वाहक यांच्या विश्रांतीगृहाची दुरवस्था !
चालक-वाहक यांच्या विश्रांतीसाठीची जागा अत्यंत अपुरी आहे. त्यांच्यासाठी असलेली स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ आहेत. विश्रांतीगृहात झोपण्यासाठी आवश्यक चटई, सतरंज्या आदी साहित्य अपुरे आहे.
पिण्याच्या पाण्याची दुःस्थिती !
पिण्याच्या पाण्याचे नळ तुटले आहेत. नळावर पाणी प्यायला पेल्याची व्यवस्था नाही. पाणी पिणार्याला किळस वाटेल, इतकी घाण नळाखाली साचली आहे. अनेक मासांपासून पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची अशी दुरवस्था आहे.
बसस्थानकासाठी स्वच्छता कर्मचार्यांची नियुक्तीच नाही ! – दत्तात्रय कुलकर्णी, आगारप्रमुखबसस्थानकात ठिकठिकाणी साठलेल्या कचर्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने आगारप्रमुख दत्तात्रय कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, परिवहन महामंडळाने बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारीच नेमलेले नाहीत. त्यामुळे सोलापूर आगारात एकही कर्मचारी कार्यरत नसल्याने स्वच्छतेची कामे वेळच्या वेळी होत नाहीत. मनुष्यबळाच्या अभावामुळे इच्छा असूनही बसस्थानकाची स्वच्छता राखता येत नाही. (या संदर्भात ‘येथे मूत्रविसर्जन करू नये’, असा फलक लावणे, दंड आकारणे आदी उपाययोजना का केल्या जात नाहीत ? स्वच्छतेसाठी कर्मचारी नाही, त्याविषयी परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा केला आहे का ? किंवा ही स्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे का ? – संपादक) |