सांगली जिल्ह्यात ३ वर्षांत विशेष मोहीम राबवून अनधिकृत सावकारांवर कारवाई !
मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – राज्यातील खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. अनधिकृत सावकारांच्या विरुद्ध तक्रारी प्राप्त होताच कारवाई करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांत विशेष मोहीम राबवून अनधिकृत सावकारांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली. सदस्य उमा खापरे यांनी सांगली जिल्ह्यातील अवैध सावकारीविषयी लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ ची प्रभावी कार्यवाही चालू आहे. काहीवेळेस लोक तक्रारी करण्यासाठी समोर येत नाही. यामुळे तक्रारी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येईल, तसेच सावकारी व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्रिसदस्य समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी, अशी दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे या प्रकरणी त्वरित कारवाई करण्यात येईल, तसेच अधिनियम २०१४ च्या अभ्यासासाठी विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल मागवून त्यातील शिफारशींचा अभ्यास करून त्या अनुषंगाने कायद्यात दुरुस्ती करण्यात येईल.