परीक्षेच्‍या काळात मंदिरांचे उत्‍सव थांबवणे योग्‍य होणार नाही !

मद्रास उच्‍च न्‍यायालयाची स्‍पष्‍टोक्‍ती !

‘पंगुनी’ उत्‍सवातील संग्रहित छायाचित्र

चेन्‍नई (तमिळनाडू) – मद्रास उच्‍च न्‍यायालयाने परीक्षेच्‍या काळात राज्‍यातील ‘पंगुनी’ उत्‍सवाला स्‍थगिती देण्‍याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. मुख्‍य न्‍यायमूर्ती टी. राजा आणि न्‍यायमूर्ती भरत चक्रवर्ती म्‍हणाले की, परीक्षेची सिद्धता करणार्‍या विद्यार्थ्‍यांना कोणतीही समस्‍या निर्माण होऊ नये, हे महत्त्वाचे आहे; मात्र त्‍यासाठी उत्‍सव थांबवणे, हे योग्‍य होणार नाही. विद्यार्थ्‍यांना एकांत मिळण्‍यासाठी जागा निर्माण करता येईल. केवळ परीक्षा म्‍हणजे जीवन नाही. उत्‍सवही महत्त्वाचे आहेत, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. त्‍याच वेळी प्रत्‍यक्ष परीक्षेच्‍या वेळी ध्‍वनीक्षेपकांचा वापर न करण्‍याचा आदेश न्‍यायालयाने दिला आहे.

१. याचिकाकर्त्‍याने म्‍हटले होते की, त्‍यांचा मुलगा आणि मुलगी एप्रिल मासात शिक्षण मंडळाच्‍या होणार्‍या परीक्षेसाठी सिद्धता करत आहेत. त्‍याच वेळी श्री सर्वसिथी विनायगर, श्री मरियम्‍मन, श्री कालियाम्‍मन आणि श्री मुनियप्‍पन कदकदप्‍पन या मंदिरांमध्‍ये पंगुनी उत्‍सव साजरा केला जाणार आहेे. एक मास हा उत्‍सव चालणार आहे. या मंदिरांच्‍या आजूबाजूला अनेक शाळा आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्‍यांच्‍या एकाग्रतेवर होईल. प्रशासनाने मंदिरांच्‍या उत्‍सवांना प्राधान्‍य देऊ नये, तर परीक्षांकडे लक्ष दिले पाहिजे. असे उत्‍सव थांबवण्‍याचा किंवा काही काळासाठी स्‍थगित करण्‍याचा प्रशासनाला आदेश द्यावा.

२. न्‍यायालयाने सरकारच्‍या युक्‍तीवादाकडेही या वेळी लक्ष दिले होते. सरकारने म्‍हटले होते की, गावांतील अधिकारी ध्‍वनीप्रदूषणाच्‍या विरोधातील नियमांकडे लक्ष ठेवतील आणि त्‍यांचे कठोरपणे पालन करवून घेतील. तसेच सुरक्षेचीही सर्व व्‍यवस्‍था करण्‍यात येईल.

संपादकीय भूमिका

दिवसभरात ५ वेळा मशिदींवरील भोंग्‍यांमुळे होणार्‍या आवाजामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या परीक्षेच्‍या सिद्धतेवर परिणाम होत आहे; म्‍हणून कधी कुणी न्‍यायालयात जात नाही, हेही तितकेच खरे आहे !