चिपळूण, १५ मार्च (वार्ता.) – आमचा लढा हा सदैव प्रस्थापितांच्या विरोधात राहिला आहे. सरकार राज्य कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करणार नसेल, तर आगामी निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी सर्व शासकीय कर्मचार्यांची एकजूट हवी, असे मनोगत शिक्षक संघटनेचे बळीराम मोरे यांनी केले. ते ‘जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी आयोजित केलेल्या बेमुदत संपात शासकीय कर्मचार्यांना संबोधित करतांना ते बोलत होते.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचारी यांचा राज्यव्यापी बेमुदत संप १४ मार्चपासून राज्यभर चालू आहे. याचाच एक भाग म्हणून चिपळूण प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन चालू आहे. या वेळी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश सावंत यांनी संपाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर शिक्षण, महसूल, ग्रामसेवक, आरोग्य, कृषी आदी संघटनांच्या पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले. शहरासह तालुक्यातील शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभाग, तालुका कृषी, पंचायत समितीमधील सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी, महसूल आदी विविध विभागांतील राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
खासदार आणि आमदार स्वतःच्या पगारात वाढ करतात, मग कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का ? – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शौकत मुकादम
एकदा निवडून आलेले खासदार आणि आमदार स्वतःच्या पगारात वाटेल तेवढी वाढ करतात. मग शासकीय कर्मचार्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष का केले जाते? आज कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचा घोषणा शासनकर्ते करत आहेत; मात्र ते शासकीय कर्मचार्यांच्या माध्यमातूनच कार्यान्वित होणार आहेत. त्या घटकाची उपेक्षा तुम्ही करू शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शौकत मुकादम यांनी केले.