भारतीय शास्‍त्रीय नृत्‍याविषयी संशोधन करून पहिल्‍या विद्या वाचस्‍पती (पी.एच्.डी.) झालेल्‍या कथकली आणि मोहिनीअट्टम् नृत्‍यगुरु पद्मभूषण कै. डॉ. कनक रेळे !

‘२२.२.२०२३ या दिवशी कथकली आणि मोहिनीअट्टम् या भारतीय शास्‍त्रीय नृत्‍यांतील श्रेष्‍ठ गुरु पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांचे निधन झाले. त्‍यांच्‍याविषयीची माहिती येथे दिली आहे

संकलक : सौ. सावित्री इचलकरंजीकर, नृत्‍य अभ्‍यासक, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. 

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने मोहिनीअट्टम् नृत्‍यगुरु पद्मभूषण कै. डॉ. कनक रेळे यांना या लेखाच्‍या माध्‍यमातून भावपूर्ण श्रद्धांजली !

नृत्‍य सादर करताना कै. डॉ. कनक रेळे

१. नृत्‍यगुरु पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांचा परिचय

सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर

नृत्‍यगुरु पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांनी भारतीय शास्‍त्रीय नृत्‍याच्‍या क्षेत्रात संशोधन करून नृत्‍याशी संबंधित विविध कलांची निर्मिती केली. त्‍यांनी अनेक विद्यार्थी घडवले. नालंदा नृत्‍यकला महाविद्यालयाच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी नृत्‍याला एक औपचारिक शिक्षणाचा नवीन मार्ग मोकळा करून दिला. त्‍यांचा नृत्‍यकलेच्‍या संदर्भातील सर्व प्रकार आणि नाट्यशास्‍त्र यांचा अतिशय गाढा अभ्‍यास होता. त्‍यांनी नृत्‍यक्षेत्रात पुष्‍कळ मोठे कार्य केले आहे.

डॉ. कनक रेळे या ‘भारतीय शास्‍त्रीय नृत्‍य’ या विषयावर विद्या वाचस्‍पती झालेल्‍या (पी.एच्.डी. केलेल्‍या) पहिल्‍याच नृत्‍यअभ्‍यासक आहेत. त्‍यांनी ‘नाट्यशास्‍त्र’, ‘हस्‍तलक्षण दीपिका’ आणि ‘बलराम भरतम्’ यांसारख्‍या शास्‍त्रीय ग्रंथांतील तंत्रे अन् कलाकार यांचा अभ्‍यास करून ‘मोहिनीअट्टम्’ नृत्‍य शिकवण्‍याची वेगळी पद्धत विकसित केली. त्‍यांनी ‘मोहिनीअट्टम्’ या नृत्‍याला पुनरुज्‍जीवन दिले.

डॉ. कनक रेळे या संगीत नाटक अकादमी पुरस्‍कार, कालिदास सन्‍मान, कलाविपंजी, एम्.एस्. सुबलक्ष्मी, अशा अनेक प्रतिष्‍ठेच्‍या पुरस्‍कारांनी सन्‍मानित होत्‍या. भारत सरकारनेही त्‍यांना पद्मश्री आणि पद्मभूषण अशा उच्‍च सन्‍मानांनी विभूषित केले होते. त्‍यांच्‍या नृत्‍यकलेचा प्रवास पुढे त्‍यांच्‍याच शब्‍दांत दिला आहे.

२. कथकली नृत्‍याचे शिक्षण

२ अ. लहान वयात कथकली नृत्‍याचे शिक्षण घेतांना ‘श्री गुरूंचे आज्ञापालन करायचे आहे’, एवढेच कळणे : श्रेष्‍ठ गुरु पांचाली करुणाकर पणिकर यांच्‍याकडे मी वयाच्‍या ७ व्‍या वर्षापासून कथकली नृत्‍याचे शिक्षण घेतले. माझ्‍या गुरूंनी मला सांगितले, ‘‘पहाटे  ४.४५ – ५ वाजता नृत्‍य सरावासाठी यायचे !’’ तेव्‍हा माझ्‍या आई-बाबांनी मला विचारले, ‘‘तू प्रतिदिन नृत्‍याच्‍या सरावाला जाशील का ?’’ मी त्‍यांना आनंदाने ‘‘हो’’ म्‍हणाले. नंतर मी नृत्‍यवर्गाला जाऊ लागले. माझ्‍या गुरूंचे घर आमच्‍या घराशेजारीच होते. आई आणि मामा यांनी मला सांगितले, ‘‘तुझे गुरु मोठे आहेत. ते जे सांगतील, ते तू कर !’’ त्‍या वयात मला ‘माझे गुरु मोठे आहेत आणि मला त्‍यांचे आज्ञापालन करायचे आहे !’, एवढेच कळले. तेव्‍हा माझ्‍या गुरूंकडे ‘पार्वतीदादा’ही यायचे. (श्रेष्‍ठ गुरु आचार्य पार्वतीकुमार माझे गुरुबंधू होते. मी त्‍यांना ‘दादा’ म्‍हणायचे.)

२ आ. कथकली हे नृत्‍य स्‍त्रिया करत नाहीत. मला वरून कुणीतरी आशीर्वाद दिला आणि म्‍हणाले, ‘तू कथकली नृत्‍य कर !’ आणि मी हे नृत्‍य शिकण्‍यास आरंभ केला.

२ इ. श्री गुरूंचा मिळालेला आशीर्वाद !

२ इ १. श्री गुरूंनी त्‍यांच्‍याकडील नृत्‍याचे उत्‍कृष्‍ट वेशालंकार देऊन आशीर्वाद देणे : माझे गुरुजी वयस्‍कर होते. त्‍यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्‍यांच्‍या शेवटच्‍या काही दिवसांत मी त्‍यांना भेटायला गेले होते. तेव्‍हा त्‍यांनी माझ्‍या हातात एक खोका दिला. मी त्‍यांना विचारले, ‘‘हे काय आहे ?’’ ते म्‍हणाले, ‘‘तूच उघडून पहा !’’ मी ते उघडून पाहिले, तर त्‍यात कथकली नृत्‍याचे दागिने होते. कथकली नृत्‍यामध्‍ये स्‍त्रियांचे पात्रही पुरुषच करतात. माझे गुरुजी हे सर्व अलंकार उत्‍कृष्‍ट बनवत होते. त्‍यांचा उत्‍कृष्‍ट असा वेशालंकार त्‍यांनी मला दिला. मी त्‍यांना नमस्‍कार केल्‍यावर ते मला म्‍हणाले, ‘‘आता हे तुझे आहे !’’ ही माझ्‍याकडे असलेली माझ्‍या श्री गुरूंची आशीर्वादरूपी आठवण आहे.

२ इ २. गुरुबंधूंनी त्‍यांच्‍या शिष्‍यांना ‘या आमच्‍या श्री गुरूंसारख्‍याच नृत्‍य करतात’, असे सांगितल्‍यावर ‘हा श्री गुरूंचा आशीर्वादच मिळाला’, असे वाटणे : एकदा कथकली नृत्‍याच्‍या एका कार्यक्रमाच्‍या वेळी मी संपूर्ण सिद्धता करून रंगमंचावर प्रस्‍तुती करण्‍यासाठी गेलेे. समोरच्‍या रांगेत माझे यजमान आणि त्‍यांच्‍या पाठीमागे आचार्य पार्वतीकुमार बसले होते. आचार्य पार्वतीकुमारांच्‍या समवेत त्‍यांचे अनेक शिष्‍यगणही बसले होते. तेव्‍हा पार्वतीकुमार त्‍यांच्‍या शिष्‍यांना उद्देशून म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही सर्व जण मला विचारत होता ना, ‘तुमचे गुरु कसे होते ?’ हे पहा, आपल्‍यासमोर आहेत. ही अगदी आमच्‍या गुरूंसारखीच नृत्‍य करते !’’ हा मला माझ्‍या गुरुजींचा आशीर्वादच वाटला. माझे गुरुबंधू आचार्य पार्वतीकुमार यांनी असे म्‍हटल्‍यावर सर्व जण माझ्‍याकडे आश्‍चर्याने पहात राहिले.

३. ‘मोहिनीअट्टम्’ हे नृत्‍य शिकणे

३ अ. आरंभी ‘मोहिनीअट्टम्’ नृत्‍य न आवडणे; मात्र काही दिवसांनी या नृत्‍यशैलीविषयी प्रेम वाटणे : मला  ‘मोहिनीअट्टम्’ हा नृत्‍यप्रकार ठाऊकही नव्‍हता. एकदा काही मल्‍याळी लोक मला सहज भेटण्‍यासाठी आले होते. त्‍यातील एक महिला ‘मोहिनीअट्टम्’ नृत्‍य करणारी होती. मला ते नृत्‍य विशेष न आवडल्‍याने मी नापसंती दर्शवली. त्‍या महिलेला पैशांची आवश्‍यकता होती; म्‍हणून त्‍यांच्‍यातील एका व्‍यक्‍तीने मला विनंती केली, ‘तुम्‍ही यांच्‍याकडे ‘मोहिनीअट्टम्’ नृत्‍य शिका !’ यानंतर मी ‘मोहिनीअट्टम्’ नृत्‍य शिकू लागले. त्‍यांनी मला त्‍यातील ३ – ४ नृत्‍ये शिकवली. केवळ एवढे शिकवून झाल्‍यावर त्‍या मला म्‍हणाल्‍या, ‘बस ! शिकवून संपले !’; पण त्‍यानंतर मला या नृत्‍य शैलीविषयी प्रेम वाटू लागले. ‘मोहिनीअट्टम्’ हे नृत्‍य शिकतांना आरंभीच्‍या काळात मला ‘मोहिनीअट्टम्’ हे पारंपरिक नृत्‍य आहे’, असेे समजले. कथकली शिकल्‍यानंतर बर्‍याच काळानंतर मी कलामंडलम् राजलक्ष्मी यांच्‍याकडून ‘मोहिनीअट्टम्’ या नृत्‍याची दिक्षा घेतली.

३ आ. भारतीय शास्‍त्रीय नृत्‍यावर प्रकल्‍प करतांना ‘मोहिनीअट्टम्’ नृत्‍यामधील बरेच बारकावे लक्षात येणे आणि त्‍यातील पारंपरिक अन् तांत्रिक शैलींची नोंद करता येणे : वर्ष १९७० – ७१ या काळात मी केरळ येथे फिरून ‘मोहिनीअट्टम्’ हे नृत्‍य जाणणार्‍या कुंजूकुट्टीअम्‍मा, चिन्‍नम्‍मूअम्‍मा आणि कल्‍याणीकुट्टीअम्‍मा यांच्‍या नृत्‍याचे चित्रीकरण केले. या प्रकल्‍पामुळे मला ‘मोहिनीअट्टम्’ नृत्‍यामधील बरेच बारकावे लक्षात आले आणि त्‍यातील पारंपरिक अन् तांत्रिक शैलींची नोंद करण्‍यासाठी साहाय्‍य झाले. आरंभी ‘संगीत नाटक अकादमी’ आणि नंतर ‘फोर फाऊंडेशन’ यांच्‍या अनुदानामुळे मला ‘मोहिनीअट्टम्’ नृत्‍याविषयी अधिक सखोल अभ्‍यास करण्‍यासाठी साहाय्‍य झाले.

४. ‘सर्वच भारतीय शास्‍त्रीय नृत्‍यांचे मूळ नाट्यशास्‍त्रात आहे’, असे लक्षात येणे

मी नृत्‍याच्‍या क्षेत्रात संशोधन करायला लागल्‍यावर प्रत्‍येक नृत्‍याची पद्धत, प्रकार आणि परंपरा यांचा अभ्‍यास केला. भारतीय शास्‍त्रीय नृत्‍यांचे ८ प्रकार आहेत. त्‍यांच्‍या मुळाशी जातांना ‘ते सर्व नाट्यशास्‍त्रात आहे’, असे माझ्‍या लक्षात आले. ‘कथकली या शैलीचा खोलवर अभ्‍यास केल्‍यानंतर मला त्‍याचे मूळही ‘नाट्यशास्‍त्र’ आहे’, याची जाणीव झाली. ज्‍याप्रमाणे सर्व भाषांची जननी संस्‍कृत आहे आणि तिच्‍यातून मराठी, गुजराती, तमिळ इत्‍यादी भाषा निर्माण झाल्‍या, त्‍याचप्रमाणे सर्व नृत्‍यांच्‍या मागे नाट्यशास्‍त्रच आहे’, असे माझ्‍या लक्षात आले.

५. गुरु-शिष्‍य परंपरेविषयी असलेला भाव !

गुरु-शिष्‍य ही भारतीय परंपरा आहे. आपल्‍याला अन्‍य कुठेही ही परंपरा दिसणार नाही. कथकली, भरतनाट्यम्, ओडिसी किंवा प्रत्‍येक कलेत गुरु-शिष्‍य परंपरा आहेच. आपल्‍याला श्री गुरूंच्‍या चरणांशी बसूनच शिकायचे असते. कुठल्‍याही कलेतील प्राणवायू श्री गुरूंकडूनच मिळतो.’

(साभार : नृत्‍यांजली (आचार्य गुरु पार्वतीकुमार यांच्‍या जन्‍मशताब्‍दीनिमित्त शास्‍त्रीय नृत्‍य संवाद मालिका)