योगऋषी रामदेवबाबा यांनी हिंदु तरुण-तरुणींसाठी आयोजित केला संन्यास महोत्सव !

१२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर तरुण करू शकतात अर्ज !

हरिद्वार (उत्तराखंड) – योगऋषी रामदेवबाबा यांनी येत्या २२ मार्च ते ३० मार्च (श्रीरामनवमी) या कालावधीत संन्यास महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात ज्यांना संन्यासी व्हायचे आहे, ते अर्ज करू शकणार आहेत. ‘ज्या तरुण-तरुणींना भिक्षू बनायचे आहे, त्यांना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, यासाठी संन्यास महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी १२ वी उत्तीर्ण, पदवीधर आणि पदव्युत्तर तरुण अर्ज करू शकतील’, असे योगऋषी रामदेवबाबा यांनी सांगितले आहे. या संदर्भात वर्तमानपत्रांतून विज्ञापनेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

या संदर्भात रामदेवबाबा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात म्हटले आहे की, कोणती जात आणि समुदाय यांत जन्मलेली एक सामान्य व्यक्ती मोठी क्रांती घडवू शकते. केवळ ती पराक्रमी आणि कठोर प्रयत्न करणारी असावी. तरुणांनी पतंजलि विश्‍वविद्यालयात शिक्षण घेऊन स्वत:मध्ये महान ऋषीमुनींसारखे व्यक्तीमत्त्व घडवावेे. संन्यासी तरुण सनातन धर्माला समर्पित असतील. कोणत्याही जातीचे आणि प्रांतातील पालक त्यांच्या हुशार मुलांचे नाव गौरवण्यासाठी त्यांना शिक्षण आणि दीक्षा घेऊन पाठवू शकतात. ही मुले सनातन धर्मात एकनिष्ठ रहातील.