राज्यासाठी लवकरच गौण खनिज आणि वाळू धोरण ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक यांना आळा घालण्यासाठी लवकरच गौण खनिज आणि वाळू धोरण घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १३ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे तडवळ येथे अवैध पद्धतीने ‘स्टोन क्रशर’ (दगड फोडण्याचे यंत्र) चालू असून त्यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या संदर्भात सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्या वेळी मंत्री विखे पाटील बोलत होते.


राज्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशाला आळा घालण्यासाठी शासनाच्या वतीने वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत असतात; परंतु असे असतांनाही राज्यात नियमबाह्य उत्खनन होत असेल आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर संबंधित यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर दायित्व निश्चित करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून ‘स्टोन क्रशर’ चालवणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.