परभणीतील ४ वर्षांच्या मुलाची केली सुटका
परभणी – मुलांना पळवून त्यांची परराज्यात लाखो रुपयांना विक्री करणार्या एका टोळीला परभणी पोलिसांनी ६ मार्च या दिवशी अटक केली. महिलांचा अधिक समावेश असलेल्या टोळीकडून एका ४ वर्षांच्या मुलाची सुटका करण्यात आली. याच टोळीने आतापर्यंत ४ लहान मुलांना ५ ते ६ लाख रुपयांना विक्री केल्याचे मान्य केले आहे, असे पोलीस अधीक्षक रागसुधा आर्. यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी भाग्यनगर येथून कह्यात घेतलेल्या ११ आरोपींमध्ये ८ जण परभणीतील रहिवासी आहेत, तर अन्य मुंबई, भाग्यनगर येथील असून एका विधी संघर्षग्रस्त मुलाचा यात समावेश आहे.
१. पोलीस अन्वेषणात धक्कादायक माहिती आरोपींनी दिली आहे. मुले खरेदी करण्यासाठी या टोळीचे नेटवर्क शेजारील राज्यांत पसरलेले होते, तर निपुत्रिक दांपत्यांना मुले विकण्यासाठी या टोळीने महाराष्ट्रातील काही शहरांना लक्ष्य केले होते. या टोळीला वैद्यकीय क्षेत्रातील काहीजण साहाय्य करत असावेत, असा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने अन्वेषण चालू आहे. महिलांचा समावेश असलेली ही टोळी भुरट्या चोरांची नाही, तर ही लहान मुलांना चोरून आंध्र-तेलंगाणा येथे विकणारी अत्यंत चालाख टोळी आहे. गुप्त माहितीच्या आधारे परभणी पोलिसांच्या पथकाने ५ महिलांसह त्यांच्या ६ साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.
२. धक्कादायक बाब म्हणजे मुले विकणारी ही टोळी गेल्या २ वर्षांपासून सक्रिय आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत अनेक मुलांची विक्री करण्यात आल्याचा संशय आहे. सध्या परभणी पोलिसांचे १ पथक परराज्यात जाऊन या प्रकरणाचे अन्वेषण करत असून या टोळीच्या अन्य सदस्यांचा शोध घेत आहे.
३. आरोपींमध्ये नूरजहा बेगम महंमद इब्राहीम शाकेर, परवीन बी सादेक अन्सारी, शेख समीर शेख सरवर, पडेला श्रावणी, एम्. रणजीत प्रसाद, संगिता पांचोली, नामीला सूर्या मांगया, शेख चाँद पाशा शेख सैलानी, राजेंद्र नरेश रासकटला, सय्यद मजहर अली सय्यद महमंद अली यांचा समावेश आहे.