१. सर्व उत्तरे जाणत असूनही साधकांना जिज्ञासेने प्रश्न विचारून त्यांना शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला विचारले, ‘‘अगं, दैवी बालकांच्या बोलण्याला मोठ्यांचा प्रतिसाद कसा असतो ?’’ त्या वेळी मी त्यांनाच प्रार्थना केली आणि उत्तर दिले, ‘‘गुरुदेव, जेव्हा दैवी बालक त्यांचे साधनेविषयीचे प्रगल्भ विचार सांगतात, तेव्हा मोठ्यांना आश्चर्य वाटते आणि ‘दैवी बालकांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते’, असे ते सांगतात; परंतु जेव्हा दैवी बालकांकडून चुका होतात किंवा ती मोठ्यांचे ऐकत नाहीत, तेव्हा मोठे साधक त्यांना रागावतात किंवा त्यांच्या चुकांची जाणीव करून देतात.’’ माझे हे उत्तर त्यांना आवडले. त्या वेळी मला जाणीव झाली, ‘परात्पर गुरुदेवांना सर्वकाही ज्ञात आहे; परंतु ‘मी उत्तर कशी देते ?’, हे त्यांना पहायचे आहे. त्या वेळी ‘माझा अहं न्यून करण्यासाठीच त्यांनी माझी अशी परीक्षा घेतली’, असे मला वाटले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समष्टी साधनेचे महत्त्व सांगितल्यावर समष्टी साधना करण्याची तळमळ निर्माण होऊन कृतज्ञता वाटणे
सत्संगात परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘व्यष्टी साधना करणारे ध्यान लावून बसतात आणि देवाकडे केवळ स्वतःसाठीच मागतात; याउलट समष्टी साधना करणारे साधनेचा प्रचार करून देवाकडे स्वतःच्या समवेत समष्टीसाठीही प्रार्थना करतात. देव समष्टी साधना करणार्यांची काळजी घेतो. समष्टी साधना करणार्यांची आध्यात्मिक प्रगती लवकर होते आणि त्यांना पुष्कळ शिकायला मिळते. व्यष्टी साधना करणारे ध्यान लावतात. त्यांनी समजून घेतले पाहिजे, ‘देव ध्यान स्वतःसाठी लावून बसतो का ? देव प्रत्येकाची काळजी घेतो आणि प्रत्येकाचे रक्षण करण्यासाठी पुष्कळ मोठी समष्टी करतो. देवापर्यंत लवकर जायचे असेल, तर देवाप्रमाणेच ‘समष्टी साधना’ करायला हवी. देवाचा सर्वांत प्रिय कोण आहे बरं ? समष्टी साधना करणारा !’’ परात्पर गुरु डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझ्यात समष्टी साधना करण्याविषयी तळमळ निर्माण झाली आणि त्यांच्या अमृतवाणीतून हे ऐकायला मिळाले; म्हणून माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
३. एकदा परात्पर गुरुदेवांनी सत्संगात सांगितले, ‘‘मी माझ्या इच्छेने काहीच करू शकत नाही. सर्वकाही गुरुदेवांच्याच इच्छेने होत आहे’, अशी जाणीव मनाला सतत असायला हवी.’’
४. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे प्राणप्रिय गुरुदेव, ‘आपल्या सुमधुर दिव्य वाणीतून किती शिकावे आणि किती लिहून घ्यावे ?’, हे कळतच नाही. आमच्यासारख्या अज्ञानी बालकांना तुम्ही आपलेसे केले असून आमच्यावर अमर्याद प्रीती करत आहात. ही सूत्रे तुम्हीच माझ्याकडून लिहून घेतलीत. आता ‘मला ती कृतीत आणता येऊ दे’, अशी प्रार्थना करते.’
– कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.