‘गांधी’ यांचे करायचे काय ?

वर्ष २००५ मध्‍ये ८३४ अब्‍ज डॉलरची असलेली भारतीय अर्थव्‍यवस्‍था वर्ष २०१४ येता-येता २ सहस्र अब्‍ज डॉलरपर्यंत पोचली. त्‍या काळी ९ व्‍या स्‍थानावर असलेल्‍या भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेने आज ३ सहस्र ४७ अब्‍ज डॉलरचा टप्‍पा गाठला असून लवकरच ती जर्मनी आणि जपान यांना मागे टाकत जगात तिसर्‍या क्रमांकावर पोचेल. ‘आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधी’चे हे वस्‍तूनिष्‍ठ आकडे देण्‍यामागील कारण असे की, अनेक वेळा काँग्रेससह अन्‍य विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करत ‘देशाची आर्थिक प्रगती होत नसून हा केवळ एक भास आहे’, असे धादांत खोटे बोलतात. कोरोना महामारीच्‍या हाहा:काराची २ वर्षे झेलूनही भारताने मागील ८ वर्षांत आर्थिक वाढीमध्‍ये जागतिक स्‍तरावर स्‍वत:ची छाप पाडली आहे. शासकीय आर्थिक साहाय्‍याच्‍या माध्‍यमातून प्रतिदिन चालू होणार्‍या नव्‍या व्‍यापारांच्‍या (‘स्‍टार्टअप्‍स’च्‍या) संख्‍येत भारत सर्वांत पुढे आहे. सध्‍या भारताच्‍या दौर्‍यावर असलेले ऑस्‍ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्‍बानीज यांनीही असाधारण वृद्धीसाठी भारताची पाठ थोपटली आहे. असे असले, तरी काँग्रेसचे राजकुमार राहुल गांधी हे ब्रिटनमध्‍ये जाऊन भारताच्‍या कथित दैन्‍यावस्‍थेसह भारतीय लोकशाहीविषयी बेताल बडबड करत आहेत.

बलदंड कि बुद्धीहीन ?

ब्रिटनमध्‍ये वक्तव्य करतांना राहुल गांधी

ब्रिटनच्‍या दौर्‍यावर जाण्‍याआधी राहुल गांधी यांनी ४ सहस्र कि.मी.ची ‘भारत जोडो यात्रा’ पूर्ण केली. मुळात नेता त्‍याचे शरीर आणि मन यांपेक्षा बुद्धीने जनतेच्‍या मनावर स्‍वत:चा ठसा उमटवतो. सशक्‍त जननेत्‍याचे हे प्रतीक असते. राहुल यांची गेल्‍या दोन दशकांची राजकीय कारकीर्द पहाता ते जनतेच्‍या ना मनाचा वेध घेऊ शकले, ना बौद्धिक दिशादर्शन करून साद घालू शकले. काँग्रेसची उतरती कळा या अपयशाचा ढळढळीत पुरावा होय. गांधी यांच्‍या दोन्‍ही इंद्रियांची जणू ही मर्यादा ओळखून ‘काँग्रेसने त्‍यांना शारीरिकदृष्‍ट्या सक्षम केले कि काय ?’, असा प्रश्‍न ‘भारत जोडो यात्रे’च्‍या काँग्रेसी प्रचार-प्रसारातून पडतो. अनेक काँग्रेसी नेत्‍यांनी यात्रेतील गांधी यांच्‍या चालण्‍या-बोलण्‍यावर स्‍तुतीसुमने उधळत ते किती उत्‍साही, ऊर्जावान, शक्‍तीशाली आहेत, हे सांगण्‍यासाठी अक्षरश: लेखांमागून लेख लिहिले. जननेता होण्‍याच्‍या अट्टहासापायी शरीर बलदंड करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍याची नामुष्‍की या ‘ग्रँड ओल्‍ड पार्टी’च्‍या नेत्‍यावर आली, यातच सर्वकाही आले !

अर्थात् भारत जोडो यात्रेतून काय साध्‍य झाले ? याचा लेखाजोखा काँग्रेस घेईल का ? या यात्रेच्‍या माध्‍यमातून राहुल यांनी काश्‍मिरी हिंदूंना न्‍याय मिळण्‍यासाठी काय केले ? पंजाबमधील खलिस्‍तानवाद संपुष्‍टात आणण्‍यापासून अनेक राज्‍यांत बोकाळलेल्‍या नक्षलवादाला आळा घालण्‍यासाठी काय केले ? याची उत्तरे राहुल यांनी कधीही दिलेली नाहीत. हे सर्व सोडून राहुल गांधी यांनी भारताचे शत्रूराष्‍ट्र ब्रिटन गाठले आणि तिकडे त्‍यांनी पुन्‍हा एकदा त्‍यांच्‍या बुद्धीमत्तेचे दर्शन घडवायला आरंभ केला. बेताल, निराधार आणि हास्‍यास्‍पद वक्‍तव्‍ये, तसेच भारतावर निराधार चिखलफेक करण्‍यास आरंभ केला. देशहितासाठी राजकारण करणे सशक्‍त लोकशाहीचे द्योतक आहे. व्‍यावहारिक स्‍तरावर घरातील मतभेद घरातच मिटवण्‍याची जागतिक रीत असतांना गांधी महाशय सातासमुद्रापलीकडे जाऊन भारताची नाचक्‍की करण्‍याचा आटापिटा करत आहेत. ‘बीबीसी’, ‘हफिंग्‍टन पोस्‍ट’ यांसारखी भारतद्वेषी प्रसारमाध्‍यमे गांधींच्‍या या वक्‍तव्‍यांचा बाऊ करून ‘गोबेल्‍स नीती’ची ‘री’ ओढत भारताला अपकीर्त करण्‍याची एकही संधी सोडणार नाहीत. काँग्रेसच्‍या एका मोठ्या अजेंड्याचा हा प्रयत्न असला, तरी यातून ना भारत, ना पंतप्रधान मोदी यांची; परंतु स्‍वत: राहुल गांधी यांचीच नाचक्‍की होत आहे. सर्वांत मोठी लोकशाही असलेल्‍या भारतात सक्षम विरोधी पक्ष नेता नाही. यामुळे भारतीय लोकशाहीची नाचक्‍की होत आहे, हे मात्र खरे !

वैचारिक गोंधळ !

‘चीनचा भारताला असलेला धोका सांगण्‍यासाठी भारतीय संसदेत राहुल महाशयांना आडकाठी केली जाते’, असा एकीकडे आरोप करतांना दुसरीकडे त्‍या चीनलाच ‘अ‍ॅस्‍पायरिंग सुपरपॉवर’ (महत्त्वाकांक्षी महासत्ता) म्‍हणत शत्रूराष्‍ट्राचे कौतुक करणे, याला वैचारिक गोंधळ नाही, तर काय म्‍हणावे ? तब्‍बल ५ मास चाललेली ‘भारत जोडो यात्रा’ ही भारतातच निर्विघ्‍नपणे पार पडलेली असतांना गांधी यांच्‍या या देशविरोधी वक्‍तव्‍यावर शेंबड्या पोरालाही हसू येईल. गांधी यांनी ब्रिटनच्‍या दौर्‍यात रा.स्‍व. संघाच्‍या विरोधात नेहमीप्रमाणे राग आळवत तिला ‘कट्टरतावादी’ आणि ‘फॅसिस्‍ट’ म्‍हणत इजिप्‍तमधील ‘मुस्‍लिम ब्रदरहूड’ या कट्टर इस्‍लामी संघटनेशी तिची तुलना केली. ‘सोनिया गांधी यांनी त्‍यांच्‍या पुत्राला नियंत्रित करावे’, या भाजपच्‍या प्रतिक्रियेतच सर्वकाही येते.

सावरकर आणि गांधी !

राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्‍ये जाऊन केलेल्‍या देशविरोधी वक्‍तव्‍यांवरून वर्ष १९०६ मध्‍ये भारत पारतंत्र्यात असतांना स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटन गाठून गाजवलेले कर्तृत्‍व आठवते. त्‍यांनी शत्रूराष्‍ट्राच्‍या गडावरून शत्रूच्‍या विरोधात क्रांतीकारी योजना आखल्‍या आणि स्‍वातंत्र्यसंग्रामाला दूरगामी दिशा दिली. जर्मनीच्‍या स्‍टुटगार्ट येथे मादम कामा यांना पाठवून भारतावरील इंग्रजांच्‍या जाचाचा विषय जागतिक स्‍तरावर पोचवण्‍याचे महत्‍कार्य सावरकर यांनी ब्रिटनमध्‍ये राहूनच केले. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांची पात्रता काय ? हे वेगळे सांगण्‍याची आवश्‍यकता नाही. सावरकर यांना ‘माफीवीर’ संबोधून हिणवणार्‍या नि त्‍यांच्‍या राष्‍ट्रनिष्‍ठेवर नेहमीच प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित करणार्‍या राहुल गांधी यांना खरेतर या प्रसंगी देशद्रोही का ठरवू नये ? असे कुणी विचारले, तर त्‍यात चूक ते काय ?

राहुल गांधी यांच्‍या वैचारिक गोंधळामुळे भारताची नव्‍हे, तर काँग्रेसचीच जगात नाचक्‍की होत आहे, हे ती लक्षात घेईल का ?