कोरोनाच्या उत्पत्तीविषयीची माहिती आम्हाला द्या ! – जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व देशांना आवाहन

अमेरिकेच्या एफ्बीआय प्रमुखाने केला होता कोरोनाची उत्त्पत्ती चीनमध्ये झाल्याचा दावा

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – कोणत्याही देशाकडे कोरोनाच्या उत्पत्तीशी संबंधित काही माहिती असल्यास त्यांनी ती आम्हाला द्यावी. आम्हाला केवळ हे जाणून घ्यायचे आहे की, महामारी कशी आणि कुठे प्रारंभ झाली ? आम्हाला काही ठोस माहिती मिळाल्यास आम्ही आगामी काळात येणारी महामारी टाळण्याचे मार्ग शोधू शकतो. तसेच पुढील समस्यांना सामोरे जाणे अगदी सोपे होईल, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना केले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेची अन्वेषण यंत्रणा एफ्बीआयचे प्रमुख क्रिस्टोफर रे यांनी दावा करतांना म्हटले होते, ‘चीनच्या वुहान प्रयोगशाळेतून कोरोना बाहेर सर्वत्र पसरला होता.’ चीनने हा दावा फेटाळून लावला होता; मात्र या दाव्याच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने वरील आवाहन केले आहे.

आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसस म्हणाले की, अमेरिकेने दाव्याशी संबंधित कोणताही अहवाल सादर केलेला नाही. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या अधिकार्‍यांनीही गुप्तचर अहवालाचा हवाला देत चीनवर आरोप केले होते; परंतु आमच्याकडे असा कोणत्याही प्रकारचा अहवाल आलेला नाही.