१ लाख ७५ सहस्र रुपयांची लाच घेतांना शिरोळ नगर परिषदेच्‍या मुख्‍याधिकार्‍यांसह तिघांना अटक !

कोल्‍हापूर – घराच्‍या बांधकाम परवान्‍याला संमती देण्‍यासाठी १ लाख ७५ सहस्र रुपयांची लाच घेतांना शिरोळ नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी अभिजित हराळे, कनिष्‍ठ अभियंता संकेत हंगरगेकर, लिपिक सचिन सावंत आणि अमित संकपाळ या चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. (मुख्‍याधिकार्‍यांसारख्‍या मोठ्या पदावर असलेल्‍या व्‍यक्‍ती लाच घेतांना आढळतात यावरून भारतात भ्रष्‍टाचाराची कशी बजबजपुरी झाली आहे,  ते कळते. भ्रष्‍टाचार्‍यांवर गुन्‍हे नोंद झाले, तरी तात्‍काळ शिक्षा होण्‍याचे प्रमाण अल्‍प असल्‍याने, तसेच हेच भ्रष्‍टाचारी काही कालावधीनंतर परत कामावर उपस्‍थित होत असल्‍याने या भ्रष्‍टाचारास सध्‍या तरी आळा बसत नाही, हे दुर्दैवी. हे चित्र पालटण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच आवश्‍यक आहे ! – संपादक)

या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदारांनी ८ सहस्र फूट भूमीवर बांधकामाची संमती घेण्‍यासाठी नगर परिषदेत आवेदन दिले होते. यानंतर सतत हेलपाटे घालूनही संमती मिळत नव्‍हती. यानंतर संकेत हंगरगेकर आणि सचिन सावंत यांनी १ लाख रुपये, तर मुख्‍याधिकार्‍यांनी प्रस्‍तावाला अंतिम संमती देण्‍यासाठी ७५ सहस्र रुपयांची मागणी केली. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची निश्‍चिती करून सापळा रचला आणि वरील सर्वांना अटक केली.